अन्य ५ ग्रामपंचायतींच्या कार्याचीही नोंद
सर्वच गावांनी खुर्सापार गावाचा आदर्श घेऊन कोरोनाचा प्रतिबंध करावा !
नागपूर – कोरोनाच्या सध्याच्या प्रतिकूल स्थितीत जिल्ह्यातील खुर्सापार गावाने कोरोनाशी दोन हात करत लढा दिला आहे. केंद्र शासनाने खुर्सापार ग्रामपंचायतीच्या कामाची नोंद घेऊन या गावाचे कौतुकही केले आहे. केंद्र शासनाच्या पंचायतराज विभागाच्या वतीने प्रकाशित ‘बेस्ट प्रॅक्टिसेस टू फाईट कोविड-१९ बाय पंचायत ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तिकेत महाराष्ट्रातील ६ ग्रामपंचायतींची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये खुर्सापार, चंद्रपूर जिल्ह्यातील चंदनखेडा, पालघर जिल्ह्यातील उंबरापाडा सफाळे, नगर जिल्ह्यातील भोयरे खुर्द आणि हिवरे बाजार, तर नांदेड जिल्ह्यातील भोसी या गावांचा समावेश आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी खुर्सापार गावाने अवलंबलेली पद्धत !
१. खुर्सापार गावातील आरोग्य केंद्राची महत्त्वाची भूमिका आहे. आशासेविकांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली.
२. गावातील शाळेत विलगीकरण केंद्र सिद्ध केले आहे; पण कोरोनाशी चांगला लढा दिल्याने गावातील विलगीकरण केंद्रात आतापर्यंत एकाही रुग्णाला ठेवण्याची वेळ आली नाही.
३. खुर्सापार येथील लोकवस्ती १ सहस्र ४०० इतकी आहे. २४ मार्च २०२० या दिवशीपासूनच येथे उपाययोजना राबवण्यास प्रारंभ करण्यात आला.
४. सरकारी सूचनांचे काटेकोरपणे पालन, युवकांची प्रभागनिहाय ‘कोविडयोद्धा’ म्हणून नियुक्ती असे स्वरूपही येथे राबवण्यात आले. येथील शासकीय आणि सार्वजनिक इमारतींना ‘सॅनिटायझर सेन्सॉर’ यंत्र लावले असून कोरोनाचे नियम मोडणार्यांवर ‘सीसीटीव्ही’द्वारे लक्ष ठेवण्यात येते.
५. बाहेरील लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘होमगार्ड’ची नेमणूक केली आहे. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आहेत. ध्वनीक्षेपकाद्वारे कोरोनाविषयी जनजागृती केली जाते. त्यामुळे सर्व निर्बंधांचे पालन होते. प्रतिमासाला ‘क्लोरिन’ फवारणी आणि धुरळणी केली जाते. गावात ठिकठिकाणी ‘वॅाशबेसिन’ आणि विलगीकरण केंद्रे स्थापन केली आहेत.
सध्या ग्रामीण महाराष्ट्रात कोरोनाची भीषण परिस्थिती आहे. अशा स्थितीत प्रत्येक गावाने खुर्सापार गावाप्रमाणे उपाययोजना केल्यास कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखणे सोपे जाईल !