|
जी गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाने करायला हवी, ती गोष्ट कढोली गावातील ग्रामस्थ करत आहेत. असे आहे, तर मग कोट्यवधी रुपये व्यय करून जनतेच्या पैशातून प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?
नागपूर – वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात कोरोना रुग्णांना बेड मिळत नाही, इंजेक्शनसाठी वाटेल ती किंमत मोजावी लागत आहे. ही वेळ आपल्या गावावर येऊ नये, यासाठी शासकीय साहाय्याची वाट न पहाता जिल्ह्यातील कढोली गावातील गावकर्यांनी पुढाकार घेत गावातच स्वत:चे ‘कोेविड केअर सेंटर’ उभारले. २० खाटांच्या या केंद्रात ऑक्सिजनचीही सोय आहे. ग्रामपंचायतीने पुढाकार घेत माजी सरपंच आणि गावकरी यांना एकत्र करत सर्व राजकीय मतभेद विसरून ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन केली. या केंद्रामध्ये आतापर्यंत गावातील १६ रुग्णांवर विनामूल्य उपचार झाले आहेत. विशेष म्हणजे या गावाचा आदर्श घेऊन आजूबाजूच्या गावांनीही असा उपक्रम राबवण्याचे प्रयत्न चालू केले आहेत.
५ सहस्र लोकवस्तीच्या कढोली ग्रामपंचायतीत सर्व सदस्य तरुण असून त्यांनी गावातून कोरोनाला हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच त्यांनी काम चालू केले. महामार्गावरील गाव आणि गावातील ७० टक्के लोक विविध आस्थापनांत कामाला जातात. त्यांचा इतरांशी संपर्क अधिक असल्यामुळे चाचणी आणि लसीकरण यांवर भर देणे आवश्यक होते. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने गावातील वृद्धांना ५ किलोमीटरवर रिक्शाने नेऊन लस देऊन आणली, तर ४५ वर्षीय वरील नागरिकांसाठी गावातच ३ लसीकरण शिबिरे घेतली.
‘जो लस घेईल, त्यालाच शासकीय सुविधांचा लाभ मिळेल’, असे पत्रकही ग्रामपंचायतीने काढले. त्यामुळे लसीची भीती वाटत असतांनाही गावकर्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले. सध्या गावात ९० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती सरपंच प्रांजल वाघ यांनी दिली.
ग्रामपंचायतीने गावकर्यांसाठी स्वतंत्र ‘व्हॉट्सअॅप ग्रुप’, ‘फेसबूक पेज’ सिद्ध करून त्याद्वारे प्रबोधन केले. कोरोनाच्या संदर्भातील ‘नकारात्मक’ पोस्ट टाकणार्यांवर बंदी केली. गावातील बाकड्यांवर कुणी गर्दी करू नये, यासाठी त्यावर काळे तेल टाकले.
अंगणवाडीत कोविड सेंटर !
लोकवर्गणीचे आवाहन केल्यानंतर एका घंट्यात ७० सहस्र रुपये वर्गणी जमा झाली. २० खाटा आणि ३ ‘ऑक्सिजन सिलिंडर’ खरेदी करून अंगणवाडीच्या शाळेत ‘कोविड सेंटर’ उभारले. प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रतिदिन १ आधुनिक वैद्य या केंद्राला भेट देईल, असे नियोजन केले. अनेक गावकर्यांनी या ‘कोविड सेंटर’साठी विविध औषधे आणि वस्तू भेट दिल्या.