अकोला, १९ मे (वार्ता.) – श्रीक्षेत्र शेगाव पासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र वझेगाव येथील विदेही संत परमहंस श्री रामचंद्र महाराज (वय ७३ वर्षे) यांनी १७ मे या दिवशी पहाटे देहत्याग केला.
चैत्र शुक्ल पक्ष नवमी या तिथीला म्हणजे रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता घुले कुटुंबात महाराजांचा जन्म झाल्याने त्यांचे नाव ‘रामचंद्र’ ठेवण्यात आले होते. महाराजांनी वयाच्या ७ व्या वर्षापासूनच अनेक दैवी लीला केल्या. सांकेतिक शब्दातील महाराजांची भाष्ये खरी ठरायची. लोकांनी त्यांना बोललेले नवस पूर्ण होते. त्यामुळे अनेक भाविक त्यांच्या दर्शनाला येत. अनेकांना त्यांच्याविषयी अनुभूतीही यायच्या. भाविकांची गर्दी बघून त्यांच्या सोयीसाठी गावाच्या बाहेर आश्रम बांधण्यात आला. (आता आश्रम म्हणजे नोंदणीकृत संस्थान आहे.) रामनवमी ते हनुमान जयंती या काळात महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आश्रमात प्रतिवर्षी कीर्तन, पारायण आणि भजनाचे आयोजन असायचे, तसेच प्रत्येक सोमवारी भाविक महाराजांच्या दर्शनाला यायचे. महाराजांनीही सोमवारीच (१७ मे) देहत्याग केला. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत महाराजांचे भक्त आहेत. त्यांच्या देहत्यागाने भक्तांवर शोककळा पसरली आहे. संत गजानन महाराज यांच्या नंतर या परिसरामध्ये असलेले विदेही संत परमहंस श्री रामचंद्र महाराज हे होते.