सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना अविरतपणे अन्नदान सेवा पुरवणार्या अंबाजोगाई येथील श्रीराम जन्मोत्सव समितीचे अभिनंदन !
अंबाजोगाई (जिल्हा बीड), १९ मे (वार्ता.) – मागील एक मासापासून येथील श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने कोरोना रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि अन्य गरजू यांना अन्नछत्र सेवेच्या उपक्रमातून विनामूल्य पौष्टिक अन्नदान केले जात आहे. कोरोना केंद्राजवळ अन्नछत्राचे वाहन उभे करून सर्व नियमांचे पालन करत समितीतील सर्व सदस्य अन्नदान करतात. यामध्ये अनेक दानशूर व्यापारी आणि अन्य समाजप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. त्यातील अनेक जण म्हणाले की, या उपक्रमात योगदान देण्यासाठी प्रभु श्रीरामच आम्हाला बुद्धी देत आहेत. आमची नावनोंदणी कुठेही करू नका, आमचे ते कर्तव्यच आहे. या उपक्रमामध्ये सर्वश्री राजकुमार गायके, अमित जाजू, सतीश केंद्रे, भैय्या टेकाळे, बबलू रामावत, नवनाथ आप्रुपल्ले, ऋषिकेश मस्ने, रवी मारवाड आदी अनेक धर्मप्रेमी पुष्कळ परिश्रम घेत आहेत. हे सर्व धर्मप्रेमी अशा विविध सामाजिक उपक्रमांत सक्रीय सहभाग घेतात.
केवळ श्रीरामाच्या कृपेने अन्नदान अविरतपणे चालू आहे ! – श्रीराम जन्मोत्सव समितीतील सदस्य
या वेळी श्रीराम जन्मोत्सव समितीतील सर्व सदस्यांनी सांगितले की, प्रारंभी हे अन्नदान केवळ १० दिवसांसाठी करण्याचे निश्चित झाले होते; मात्र मागील एक मासापासून अविरतपणे हे अन्नदान कसे चालू आहे ? हे आम्हालाही कळत नाही. ‘हे अन्नदान केवळ श्रीरामाच्या कृपेने चालू आहे’, असे आम्हाला वाटते.