चीनकडे लिक्विड ऑक्सिजन नसल्याने त्यासाठी नेपाळची भारताकडे मागणी !

चीनच्या भरवश्यावर भारताला डोळे वटारून दाखवणार्‍या नेपाळला त्याच्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी शेवटी भारताकडेच हात पसरवावे लागत आहेत, हे त्याने लक्षात ठेवावे !

नवी देहली – भारताप्रमाणे शेजारील नेपाळमध्येही कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. प्रतिदिन सहस्रोंच्या संख्येने लोक कोरोनामुळे बाधित होत आहेत, तर शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. तेथे ऑक्सिजनचाही मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. अशा वेळी नेपाळने साहाय्यासाठी भारताकडे अपेक्षा व्यक्त केली आहे. नेपाळला सिरम इन्सिट्यूटटच्या कोविशील्ड लसीचेही १० लाख डोस मिळाले आहेत; मात्र सिरमसमवेत नेपाळचा २० लाख डोसचा करार झाला आहे. नेपाळला अशी आशा आहे की, त्याला लवकरच भारतातून लसीचे आणखी डोस मिळतील.

१. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचे विदेश सल्लागार रंजन भट्टाराय यांनी एका भारतीय दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, पंतप्रधान ओली यांच्या इच्छा आहे की, भारताने त्यांना या कठीण काळात ऑक्सिजन, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर यांचा पुरवठा करावा.

२. भट्टाराय असेही म्हणाले की, ओली यांचे चीनसमवेत चांगले संबंध आहेत. सध्या चीन नेपाळला कोरोनाविरोधातील लढ्यासाठी औषधे आणि लस यांचा पुरवठा करत आहे; मात्र कोरोनापासून बचावासाठी लागणारे लिक्विड ऑक्सिजन चीनकडे नाही. नेपाळमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्याने तेथील नागरिकांची चिंता वाढली आहे. ऑक्सिजनची मागणी १० पटींनी वाढली असून आम्ही यासाठी भारत सरकारसमवेत चर्चा करत आहोत.