सोयीस्कर खापर !

फ्रान्सच्या शार्ली हेब्दो या प्रसिद्ध नियतकालिकाने आता हिंदूंच्या देवतांना भारतातील कोरोना रुग्णांच्या ऑक्सिजनअभावी होणार्‍या मृत्यूंसाठी उत्तरदायी ठरवण्याचा हास्यास्पद प्रकार केला आहे. या नियतकालिकाने एका चित्रात अनेक भारतीय भूमीवर झोपले असून ते ऑक्सिजनसाठी तडफडत आहेत, असे दाखवून या चित्राच्या खाली ३ कोटी ३० लाख देवता; मात्र एकही ऑक्सिजनचे उत्पादन करण्यास सक्षम नाही, असे लिहिले आहे. मुळात हे नियतकालिक जितके प्रसिद्ध त्याहीपेक्षा अधिक ते वादग्रस्त. काही वर्षांपूर्वी या नियतकालिकाने प्रेषित महंमद पैगंबर यांचे वादग्रस्त चित्र प्रकाशित केले होते. अर्थात् त्याचे मोठे मूल्य त्यांना चुकवावे लागले. जानेवारी २०१५ मध्ये दोघा इस्लामी आक्रमणकर्त्यांनी शार्ली हेब्दोच्या पॅरीसमधील मुख्यालयावर आक्रमण करून १२ जणांना यमसदनी धाडले. एका क्षणात होत्याचे नव्हते केले. या आक्रमणाने संपूर्ण फ्रान्स हादरले. तेथील तत्कालीन पंतप्रधान फ्रँकोईस ओलांदे यांनी हे आतंकवादी आक्रमण असल्याचे घोषित केले. पुढे वर्ष २०२० मध्ये या नियकालिकाने पुन्हा तेच चित्र प्रसिद्ध करण्याचे सूतोवाच केले, तेव्हाही जगभरातील इस्लामी राष्ट्रांत रणकंदन माजले. आता याच शार्ली हेब्दोने हिंदूंच्या ३३ कोटी देवतांचा घोर अवमान केला आहे. सांगायचे तात्पर्य हेच की, या नियतकालिकाला ख्रिस्ती पंथ सोडून अन्य धर्मांची आणि त्यांच्या श्रद्धास्थानांची हेटाळणी अन् कुचेष्टा करण्याची खुमखुमी आहे. तेच त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाटते.

हिंदुद्वेषाचा दर्प !

सध्या भारतात कोरोनाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. येथे प्रतिदिन आढळणारी रुग्णसंख्या नवा विक्रम नोंदवत आहे. अशात प्रशासकीय बाबूंच्या चुकांमुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन अनेकांचे हकनाक बळी जात आहेत. म्हणजे चूक कुणाची आहे, हे स्पष्ट असतांना शार्ली हेब्दोने जाणूनबुजून याचे खापर हिंदूंच्या ३३ कोटी देवतांवर फोडले आहे. खरे तर शार्ली हेब्दोने कोरोनाचा निर्माणकर्ता असलेल्या चीनला चार खडेबोल सुनावले असते, तर ते सयुक्तिक ठरले असते; परंतु त्याला त्यात स्वारस्य नाही. त्याचा उद्देश हिंदूंना लक्ष्य करणे, हा आहे. शार्ली हेब्दोने रेखाटलेली हिंदूंच्या देवतांची अवमानकारक चित्रे त्याच्या हेतूवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारी आहेत. कोरोनाने फ्रान्सलाही विळखा घातला होता. तेथे अनेक लोक मरत होते. अनेक ख्रिस्ती राष्ट्रांची स्थिती त्या वेळी भारतापेक्षा अत्यंत वाईट होती. तेथे मृतांचे डोंगर रचले जात होते. तेव्हा शार्ली हेब्दोने या परिस्थितीसाठी ख्रिस्त्यांच्या श्रद्धास्थानाला दोषी धरले होते का ? मग आताच एकदम भारतातील ऑक्सिजनच्या तुटवड्याचे खापर थेट हिंदूंच्या देवतांवर फोडण्यामागचे कारण काय ? दुसरे म्हणजे कोरोनावरून जेव्हा जगभरात हाहाःकार उडाला होता, ख्रिस्ती राष्ट्रे कोरोनाबाधितांचे आणि कोरोनामृतांचे प्रतिदिन नवनवे विक्रम रचत होती, तेव्हा भारतातील कोरोनाची परिस्थिती उत्तमपणे नियंत्रणात होती. त्यासाठी शार्ली हेब्दोने भारतातील ही चांगली परिस्थिती हिंदूंच्या ३३ कोटी देवांमुळे आहे, असे म्हटले होते का ? तसे म्हटले असते, तर ती तटस्थ पत्रकारिता झाली असती. तसे त्याने म्हटले नाही; यावरून त्याचा हेतूच पूर्वग्रहदूषित आहे, हे स्पष्ट होते. म्हणूनच या चित्राला हिंदुद्वेषाचा दर्प येतो.

अज्ञान कि श्रद्धाभंजन ?

शार्ली हेब्दो नियतकालिकाने या चित्रावर ३ कोटी ३० लाख देवता; मात्र एकही ऑक्सिजनचे उत्पादन करण्यास सक्षम नाही, असे लिहिले आहे. हे चित्र रेखाटण्यामागे दोन गोष्टी असू शकतात. एक म्हणजे अज्ञान आणि दुसरे म्हणजे श्रद्धाभंजन ! प्रथम अज्ञानाचा विचार केला, तर या चित्रातून जनजागृती वगैरे होतांना अजिबात दिसत नाही, उलट अज्ञानच अधिक प्रकट होते. कारण हिंदूंचे देव ३ कोटी ३० लाख नसून ३३ कोटी आहेत, हेच ही हिंदुद्वेषी मंडळी टीका करण्याच्या नादात विसरली असावी. दुसरे म्हणजे कुणाच्या मरणासाठी देवतांना उत्तरदायी ठरवण्याचे कारण नाही; कारण अध्यात्मशास्त्रीय सिद्धांतानुसार जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धानुसार होत असतात. हिंदूंचे उच्च कोटीचे सिद्धांत ज्ञात करून न घेता उचलला कुंचला, ठेवला कागदावर, अशी शार्लीची विवेकशून्य कार्यशैली आहे. आता या अज्ञानाला कुणी व्यक्तीस्वातंत्र्य म्हणत असेल, तर मग मात्र हसावे कि रडावे ? हे कळेनासे होते. देव नेहमी भक्तांच्या साहाय्याला धावून येतो आणि त्यांचे रक्षण करतो, याची प्रचीती आजही कोट्यवधी हिंदू घेत आहेत, हे शार्ली हेब्दोवाल्यांनी लक्षात घेतले पाहिजे. तिसरे म्हणजे हिंदूंचे देव ऑक्सिजनचे उत्पादन करण्यास सक्षम नाहीत, असे या नियतकालिकाने म्हटले आहे. मुळात सृष्टीची उत्पत्ती देवतांनीच केली असल्याने त्यात ऑक्सिजनचाही समावेश आहे; मात्र आताची स्थिती देवतांमुळे नाही, तर प्रशासन आणि अन्य यंत्रणा यांच्या चुकांमुळे निर्माण झालेली आहे. भारतातीलच नव्हे, तर जगभरातील लोक साधना करणारे असते, तर कोरोनासारखे संकट आले नसते किंवा आलेच असते, तरी ते इतके भयावह झाले नसते, हेही शार्ली हेब्दोने लक्षात घ्यावे. आता श्रद्धाभंजनाच्या सूत्राचा विचार करूया. कोरोना ही महामारी आहे. तो संसर्गजन्य रोग आहे. यात भारतातील नव्हे, तर जगभरातील लोक मृत्यूमुखी पडले आहेत. भारतातील मृत्यूंसाठी जर हिंदूंच्या देवतांना उत्तरदायी ठरवायचे असेल, तर मग अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, स्पेन, ब्राझिल, जर्मनी, रशिया, तुर्की, सौदी आदी देशांतील मृत्यूंसाठी कोण उत्तरदायी आहे ? हे शार्ली हेब्दो का सांगत नाही ? कि ते सांगण्याचे धाडस त्यांच्यात नाही ? कि ते सांगणे हे त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यात बसत नाही ? खरे तर शार्ली हेब्दोने हिंदूंवर टीका करण्याऐवजी हिंदूंचे धर्मसिद्धांत जाणून घेतले असते, तर अशा साथीच्या रोगांमागील कारणापर्यंत पोचून त्यावर उपायही शोधता आले असते. पापे मनुष्याने करायची आणि ती भोगायची वेळ आली की खापर देवावर फोडायचे, हा निर्लज्जपणा आहे अन् शार्ली हेब्दोने तो ज्ञान असल्याच्या आविर्भावात केला आहे. स्वतःच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करणार्‍या शार्ली हेब्दोला मुसलमानांनी धडा शिकवला, आता हिंदू आपल्या देवतांच्या विडंबनाचा किमान शाब्दिक निषेध तरी नोंदवतील का ? हा खरा प्रश्‍न आहे.