तौते चक्रीवादळामुळे केरळ आणि तमिळनाडू राज्यांना अतीदक्षतेची चेतावणी !

नवी देहली – तौते चक्रीवादळाचा धोका पश्‍चिम किनारपट्टीवर वाढल्याने केरळ आणि तमिळनाडू राज्यांना केंद्रीय जल आयोगाकडून अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. या दोन्ही राज्यांच्या किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ लक्षद्वीप बेटांच्या परिसरातून पश्‍चिम किनारपट्टीच्या दिशेने सरकू लागले आहे.

१. केरळमधील मनिमला आणि अकानकोविल, तर तमिळनाडूमधील कोडईयार या तिन्ही नद्या धोक्याच्या पातळीच्याही वर वहात आहेत. त्यामुळे या दोन्ही राज्यांनी किनारी भागामध्ये सतर्कतेचा आदेश दिला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी एन्.डी.आर्.एफ्.च्या ५३ तुकड्या सज्ज आहेत. यांपैकी २४ तुकड्यांना आधीच संभाव्य प्रभावित क्षेत्रांमध्ये पाठवण्यात आले आहे, तर उरलेल्या २९ तुकड्या ऐन वेळी ५ सर्वाधिक धोका असणार्‍या राज्यांमध्ये निर्माण होणार्‍या परिस्थितीसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

२. तौते चक्रीवादळाच्या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किनारी भागातील जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सतर्क रहाण्याचे आणि संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज रहाण्याचा आदेश दिला आहे. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.