नगर – वडाळा महादेव येथील महायोगी प.पू. गुरुदेव काटेस्वामीजी यांचे शिष्य आणि उत्तराधिकारी प.पू. भास्करकाका यांनी १४ मेच्या पहाटे साडेसहा वाजता श्रीरामपूर येथील गुरुदेव काटेस्वामी आश्रमात देहत्याग केला. त्यांचे वय ६१ वर्षे होते. १५ मे या दिवशी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांनी प.पू. गुरुदेव काटेस्वामीजी यांची २७ वर्षे अखंड आणि तळमळीने सेवा केली. प.पू. गुरुदेव काटेस्वामीजी यांनी देहत्याग केल्यानंतर आश्रमाचे सर्व दायित्व त्यांच्यावर होते. अलीकडच्या काही दिवसांपासून ते शिर्डी येथे रुग्णाईत होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या मातोश्री प.पू. जानकीदेवी, तसेच लहान भाऊ आहे. प.पू. जानकीदेवी या उच्च कोटीच्या संत आहेत.
प.पू. भास्करकाका आणि सनातन संस्था
वडाळा महादेव येथील ज्ञानयोगी प.पू. गुरुदेव काटेस्वामीजी यांचे शिष्य तथा उत्तराधिकारी प.पू. भास्करकाका यांचे सनातनच्या रामनाथी आणि देवद येथील आश्रमांत काही दिवस वास्तव्य होते. त्यांनी साप्ताहिक ‘सनातन चिंतन’ आणि मासिक ‘घनगर्जित’ मध्ये प्रकाशित झालेले गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे लिखाण ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी उपलब्ध करून दिले. सनातनच्या आश्रमांमध्ये त्यांनी त्यांच्या वास्तव्यात साधकांचे त्रास दूर होण्यासाठी अनेक वेळा हवन केले होते. सनातनचे साधक त्यांच्या आश्रमात नामजपादी उपायांसाठी गेल्यावर त्यांनी त्यांच्या जवळील अमूल्य ज्ञान देऊन साधकांवर प्रीतीचा वर्षाव केला.