महाराष्ट्रातील दळणवळण बंदीमध्ये १ जूनपर्यंत वाढ, निर्बंध अधिक कडक

मुंबई – महाराष्ट्रातील दळणवळण बंदी १ जूनपर्यंत वाढवण्यात आली. राज्यशासनाकडून याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍या नागरिकांसाठी ‘आर्टीपीसीआर्’ चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोणत्याही मार्गाने प्रवेश करणार्‍या व्यक्तीकडे ‘कोरोना निगेटिव्ह’चा रिपोर्ट असणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ४८ घंटे आधी हा रिपोर्ट काढलेला असावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ‘कार्गो कॅरिअर’मध्ये चालक आणि क्लीनर दोघांनाही प्रवासाची अनुमती असणार आहे; मात्र ते बाहेरील राज्यांतील असतील, तर त्यांना कोरोना चाचणी ‘निगेटिव्ह’ असणे बंधनकारक असणार आहे. बाजारपेठांविषयी तेथील स्थानिक प्रशासनाला असलेला निर्णय देण्याचा अधिकार कायम ठेवण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करावयाचे असल्यास ४८ घंटे आधी नोटीस देणे बंधनकारक असेल. उर्वरित निर्बर्ंध आधीच्या दळणवळण बंदीप्रमाणेच रहाणार आहेत.