‘आम्ही देवाचे लाडके कसे आहोत आणि त्याचा लाभ कसा करून घ्यावा ?’, याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी देवद आश्रमात केलेले मार्गदर्शन !

१५.११.२०२० या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी देवद आश्रमात ‘आम्ही देवाचे लाडके’ कसे आहोत’, याविषयी साधकांना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

या लेखाचा पहिला भाग बुधवार, १२ मे २०२१ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आला. आज या लेखाचा उर्वरित भाग प्रसिद्ध करत आहोत.

भाग १ वाचण्यासाठी या लिंकवर किल्क करा : https://sanatanprabhat.org/marathi/476099.html

सद्गुरु राजेंद्र शिंदे

२. ‘साधक देवाचे लाडके का आहेत ?’, हे दर्शवणारी उदाहरणे

२ ऐ. ‘जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटणे’, हा जीवनातील पुष्कळ मोठा टप्पा असणे आणि सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करून अन् ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठून अनेक साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले असणे : सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करून आतापर्यंत ११३१ साधक ६० टक्के किंवा त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत, तर ११० साधक संतपदी विराजमान झाले आहेत. काही साधक सद्गुरुपदी, तर काही साधक परात्पर गुरु पदापर्यंतही पोचले आहेत. साधकांवर देवाची एवढी कृपा आहे; कारण आम्ही देवाचे लाडके आहोत !

‘जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटणे’, हा मनुष्य जीवनातील एक मोठा टप्पा आहे. अनेक ग्रंथांमध्ये ‘जन्म-मृत्यूचा फेरा चुकवण्यासाठी प्रयत्न करा’, असे पुन: पुन्हा लिहिलेले आपल्या वाचनात येतेे. जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून बाहेर पडणे, याचे महत्त्वच समाजातील लोकांना अजून कळलेले नाही. वारी वारी जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट निवारी ॥ अशी देवीची आरती प्रतिदिन म्हणणार्‍यांनाही ‘ते कसे साध्य करावे ?’, हे लक्षात येत नाही. ते मानवावरचे महासंकट असून त्याला जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून बाहेर पडताच येत नाही. सनातनचे साधक मात्र अगदी सहजपणे या संकटातून बाहेर पडत आहेत.

२ ओ. जगभरात कुठेही दैवी बालक जन्माला आले, तरी देवाने त्याला सनातनशीच जोडणे : भारतातच नव्हे, तर या जगभरात कुठेही दैवी बालक जन्माला आले, तरी देव त्याला सनातनशीच जोडतो; कारण ‘त्यांच्या स्तरावरील साधनेविषयीचे योग्य मार्गदर्शन केवळ सनातनच देऊ शकते’, याची देवाला निश्‍चिती आहे, हे सनातनचे वैशिष्ट्यच आहे. आजमितीस महर्लोकातील २१९ आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ८७४ दैवी बालके सनातनशी जोडली गेली आहेत. त्यांच्यातील उपजत गुणांमुळे पुढे ते हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये मोठे योगदान देणार आहेत.

असा देवाचा मोठा वरदहस्त असणार्‍या दैवी बालकांना देवाने सनातनशी जोडले; कारण आम्ही देवाचे लाडके आहोत !

२ औ. नाडीभविष्याच्या माध्यमातून सनातन अनुभवत असलेली महर्षि आणि सप्तर्षि यांची कृपा ! : सनातनविषयी माहिती असलेल्या अक्षरश: लक्षावधी नाडीपट्ट्या उपलब्ध आहेत. शिव आणि पार्वती यांचा संवाद असलेल्या या नाडीपट्ट्यांतून सनातनविषयी पुष्कळ माहिती दिलेली आहे. या माध्यमातून महर्षि आणि सप्तर्षि यांनी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले श्रीविष्णूचे अवतार आहेत आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ महालक्ष्मीच्या अवतार आहेत’, हे आम्हाला सांगितले. अन्यथा आम्हाला ते कधी कळलेच नसते. केवढी ही आमच्यावर भगवंताची कृपा आहे !

या नाडीभविष्यात सनातनच्या कार्याविषयी जशी माहिती दिली आहे, तसेच सनातन संस्था आणि साधक यांच्यावर येणार्‍या अडचणी यांवर विस्तृत उपाययोजनाही दिली आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेतील सर्व अडथळे दूर करण्यासाठी ‘कोणत्या वेळी काय करायला हवे ?’, याविषयी महर्षि आणि सप्तर्षि अचूक मार्गदर्शन करतात. आपल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देऊन उपाययोजनाही सांगतात. ‘हे सर्व दैवी नियोजनानुसार कसे चालू आहे’, हे साधकांना अनुभवता येत आहे. त्यामुळे त्यांची श्रद्धा, भक्ती आणि भाव जलद गतीने वाढत आहे.

२ अं. साधनेसाठी आवश्यक मार्गदर्शन अखंड उपलब्ध असणे : साधना करतांना ‘मोक्षप्राप्ती करणे’, हे ध्येय असते. ईश्‍वराशी एकरूप होणे, म्हणजेच मोक्ष प्राप्त करणे होय ! ईश्‍वर परिपूर्ण आहे. त्याच्यात एकही दोष नाही. त्याच्याशी एकरूप होणे, म्हणजे आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे अन् ईश्‍वराचे गुण आणण्यासाठी प्रयत्न करणे. याअंतर्गत साधक स्वतः ही प्रक्रिया राबवत असतांना त्याला ‘स्वतःचे सर्वच स्वभावदोष लक्षात येतील’, असे नाही. अशा साधकांचे निरीक्षण करून त्यांच्या लक्षात न आलेले अनेक स्वभावदोष सहसाधक साधनेत साहाय्य होण्यासाठी साधना म्हणून त्या त्या वेळी सांगत असतात. याचा साधकांना पुष्कळ लाभ होतो. साधकाच्या कधीच लक्षात न आलेले अनेक पैलू त्याला लक्षात आल्याने प्रयत्न करून पुढे जाणे सोपे जाते. या प्रत्येक टप्प्यावर त्याला उत्तरदायी साधकांकडून साधनेत पुढे जाण्याच्या संदर्भातील सर्व प्रकारचे उत्तम मार्गदर्शन आणि सहकार्य सातत्याने लाभत असते. अशा प्रकारचे मार्गदर्शन जगभरात कुठेच मिळत नसणार ! ही देवाची कृपा केवळ देवाचे लाडके असल्यानेच साधकांना अनुभवता येत आहे.

‘देवाचे लाडके आहोत’, हे सिद्ध करण्यासाठी अनेक उदाहरणे देऊ शकतो. प्रत्येक साधकाने अंतर्मुख होऊन स्वतःच्या पूर्वायुष्याकडे पाहिले किंवा वर्तमानकाळात घडत असलेल्या प्रत्येक प्रसंगाचा अभ्यास केल्यावर त्याच्या सहज लक्षात येऊ शकते की, आम्ही देवाचे कसे लाडके आहोत !

३. देवाचे लाडके असल्याचा लाभ करून घेण्यासाठी काय करायला हवे ?

३ अ. लाडक्या मुलाचे हट्ट पुरवण्यात पालकांना जसा आनंद मिळतो, तसेच देवाला साधकांचा हट्ट पुरवण्यात आनंद असल्याने आपण साधनेसाठी देवाकडे हट्ट करायला हवा ! : जो लाडका मुलगा असतो, त्याला ठाऊक असते की, माझे सर्व लाड पुरवले जातात. त्यामुळे तो आई-बाबांना सांगतो, ‘मला नवीन कपडे पाहिजेत, मला हे खायला पाहिजे, मला ते पाहिजे इत्यादी. मग त्याचे आई-वडील त्याला हवेे ते सर्व देतात. त्याचे हट्ट पुरवण्यात आई-वडिलांना वेगळाच आनंद मिळतो. असाच हट्ट आपण भगवंताकडे साधनेसाठी का करू नये ? आपल्याला साहाय्य करण्यासाठी आणि आपला हट्ट पुरवण्यासाठी भगवंत सदा सिद्धच आहे. आपला हट्ट पुरवण्यात देवाला आनंदच आहे; कारण आपण देवाचे लाडके आहोत !

३ आ. देवाला अपेक्षित अशी साधना होण्यासाठी साधकांनी देवाकडे पुढील हट्ट करावा !

१. देवा, मला माझ्या स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव करून दे रे अन् ते दूर करण्यासाठी तूच माझ्याकडून प्रयत्न करवून घे. मला काही येत नाही आणि मला काही जमतही नाही. ‘सहसाधकांच्या माध्यमातून तूच मला माझे स्वभावदोष आणि अहंचे पैलू सांगून साधनेत साहाय्य करत आहेस’, याची मला जाणीव होऊ दे. देवा, माझे स्वभावदोष आणि अहं नष्ट कर.

२. ‘देवा, मला प्रत्येक प्रसंगात अभ्यास कसा करायचा’, ते शिकव. ‘प्रत्येक प्रसंग माझ्या भल्यासाठीच तू घडवत आहेस’, याचे मला चिंतन करायला शिकव.

३. देवा, मला भावजागृतीचे प्रयत्न करता येत नाहीत. ‘भावाच्या स्थितीत कसे रहायचे’, तेही मला कळत नाही. तूच माझ्याकडून भावजागृतीचे प्रयत्न करवून घे रे. (दिवसातून १० – १५ वेळा किंवा जितके जमेल, तितके वेळा देवाकडे हट्ट करावा. हट्ट करणारी व्यक्ती जशी रडत असते, तसे देवापाशी रडून हट्ट करायचा.)

४. देवा, परात्पर गुरु डॉक्टरांना भावाच्या स्थितीत राहिलेले आवडते. त्यामुळे तू मला लवकर भावाच्या स्थितीत रहायला शिकव.

५. हे भगवंता, तू माझ्यामध्ये शरणागतीचा भाव निर्माण कर. ‘कर्ता-करविता तूच आहेस’, हेच माझ्या मनात प्रत्येक प्रसंगात बिंबले गेले पाहिजे. माझे अस्तित्व लवकरात लवकर नष्ट कर रे भगवंता !’

अशा विविध प्रकारच्या प्रार्थनांच्या माध्यमातून आपण देवाकडे हट्ट करू शकतो.

एखादा लाडका मुलगा जसा हक्काने हट्ट करतो, तसे आपले हट्ट पुरवण्यासाठी देवाकडे हट्टीपणा करायचा आहे. मग देव हे सर्व देतोच !

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.११.२०२०)  (समाप्त)

अनोळखी व्यक्तीकडे भीक मागणार्‍या भिकार्‍यालाही भीक मिळून त्याचा चरितार्थ चालत असणे, तर सर्वशक्तीमान देवाकडे साधनेसाठी सतत भीक मागितल्यास देव निश्‍चितच सर्व देणार असणे

भिकारी भीक मागत असतो. भीक मागणारी व्यक्ती आणि भीक देणारी व्यक्ती दोघांपैकी कुणीच कुणाला ओळखत नसते. असे असूनही ती व्यक्ती भीक मागत जाते. कुणाला तरी दया देते आणि ती व्यक्ती भीक देते. असे दिवसभर चालू असते. भिकार्‍याला दिवसभरात पुष्कळ भीक मिळते. याच प्रकारे भीक मागून कित्येक भिकारी लक्षाधीशही होतात. वर्तमानपत्रांत याची उदाहरणे वाचायला मिळतात. भिकारी कधीच उपाशी रहात नाही. जर त्याला सहज भीक मिळते आणि भीक मागून त्याचा चरितार्थही सहज चालतो, तर साधनेसाठी आपण देवाकडे वरील गोष्टींची सतत भीक मागितली, तर देव देणार नाही का ? आपला हट्ट पुरवणार नाही का ? यासाठी आपण सतत देवाला शरण जायला पाहिजे. ‘देवाकडे काय मागायचे ?’, ते शिकायला पाहिजे. मग देव आम्हाला सर्व देणारच आहे; कारण आम्ही देवाचे लाडके आहोत !

आम्ही आहोत देवाचे लाडके ।

आम्ही आहोत देवाचे लाडके । आम्हाला अशक्य ते काय बरे ॥ १ ॥

अशक्य ते शक्य करतील साकार ।
सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉक्टर ॥ २ ॥

साधकांनो, श्रद्धा मनी वाढवा लवकर ।
साधनेचा प्रवास होईल मग सुकर ॥ ३ ॥

साधनेतील अडथळे होतील दूर । अनुभवास येईल गुरुकृपेचा सूर ॥ ४ ॥

नाही आपत्काळाचे आम्हा भय । आहे गुरुकृपेची आम्हापाशी ठेव ॥ ५ ॥

प्रत्यक्ष भगवंत अवतरला भूवर ।
तया अनुभवण्या वाढवा भक्ती-भाव लवकर ॥ ६ ॥

नेईल तो मोक्षासी आपणास सत्वर ।
चला जाऊ त्यांना शरण सर्वस्व (टीप १) अर्पून ॥ ७ ॥

टीप १ : तन, मन आणि धन

इदं न मम ।
श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।’

– सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.११.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक