‘आम्ही देवाचे लाडके कसे आहोत आणि देवाचे लाडके असण्याचा लाभ कसा करून घ्यावा ?’, याविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१५.११.२०२० या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी देवद आश्रमात ‘आम्ही देवाचे लाडके’ कसे आहोत’, याविषयी साधकांना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

१. सनातनचे साधक देवाचे लाडके असल्याने भगवंत त्यांच्यावर भरपूर प्रेम करत असणे

‘आपण ज्याचे लाडके असतो, ती व्यक्ती आपल्यासाठी काहीही करायला सिद्ध असते, तसेच ‘आपले कोण लाडके असेल’, तर आपण त्या व्यक्तीसाठी काहीही करायला सिद्ध असतो. तिच्यासाठी कष्ट घ्यायला, तिला साहाय्य करायला सिद्ध असतो. ती व्यक्ती कशीही असो, लाडक्या व्यक्तीवर प्रेम करायला आपण सदैव सिद्ध असतो. भगवंताचेही तसेच आहे. सनातनचे साधक देवाचे लाडके असल्याने भगवंत आपल्यावर भरपूर प्रेम करतो; परंतु साधकांना हे लक्षात येत नाही.

२. ‘साधक देवाचे लाडके का आहेत ?’, हे दर्शवणारी उदाहरणे

पुढील काही उदाहरणांवरून ‘सनातनचे साधक देवाचे का लाडके आहेत ?’, ते लक्षात येईल.

२ अ. जगातील कोट्यवधी लोकसंख्येपैकी ‘ईश्‍वरी राज्य यावे’, यासाठी केवळ साधकच प्रयत्न करत असणे : सध्याची जगाची लोकसंख्या अनुमाने ७५० कोटी आहे. यांपैकी ‘किती जण देवाला अपेक्षित अशी साधना करतात ?’, हा मोठा प्रश्‍नच आहे. ‘पृथ्वीची झालेली दुर्दशा दूर करून या भूतलावर पुन्हा एकदा ईश्‍वराचे, म्हणजे ईश्‍वरी राज्य यावे’, असे किती जणांना वाटते आणि त्यातील किती जण त्यासाठी साधना म्हणून प्रयत्न करत आहेत ?

२ अ १. सकाम साधना करणारे पुष्कळ असून केवळ साधकच निष्काम साधना करत असल्याने त्यांच्यावर ईश्‍वराचे प्रेम असणे : जगात साधना करणारे पुष्कळ जण दिसत असले, तरी देवाला अपेक्षित अशी साधना करणारे मात्र नगण्य आहेत. साधना करणार्‍यांतील पुष्कळ जण सकाम साधना करणारे आहेत. धन-दौलत, संपत्ती, लग्न, ‘करियर’ इत्यादी इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सकाम साधना करणार्‍यांविषयी देवाला जितके प्रेम वाटेल, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी जे साधक ‘देवाचे राज्य’, म्हणजेच ‘ईश्‍वरी राज्य’ भूतलावर येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर ईश्‍वराचे प्रेम असणार आहे.

२ अ २. परात्पर गुरु डॉक्टरांनी स्थापन केलेल्या ‘सनातन संस्थे’चे साधक तन, मन-धनाचा त्याग करून ईश्‍वरी राज्य येण्यासाठी समष्टी साधना करत असल्याने ते देवाचे लाडके असणे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि त्यांनी स्थापन केलेल्या सनातन संस्थेचे काही सहस्र साधक आपली साधना म्हणून तन, मन आणि धन यांचा त्याग करून अविरत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भगवंताच्या अखंड कृपेचा वर्षाव होत आहे. या समष्टी ध्येयामुळे ते देवाचे लाडके झाले आहेत. देवाला त्याचे ईश्‍वरी राज्य भूतलावर येण्यासाठी प्रयत्न करणारे निश्‍चितच जवळचे वाटतात. मग देव त्यांच्यावर का प्रेम करणार नाही ? आपण ईश्‍वरी राज्य येण्यासाठी प्रयत्न करणारे सनातनचे साधक आहोत; म्हणून आपण देवाचे लाडके आहोत. जे देवाचे कार्य करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करतात, ते नक्कीच देवाचे लाडके आहेत.

२ आ. पृथ्वीवरील ७५० कोटी लोकांमध्ये केवळ काही सहस्र साधकांनाच प्रत्यक्ष श्रीविष्णुस्वरूप भगवंत, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर गुरुरूपात लाभलेले असणे : आपल्याला प्रत्यक्ष श्रीविष्णुस्वरूप भगवंत, अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक, सर्वव्यापी, सर्वज्ञानी, परम कृपाळू, परम दयाळू, वात्सल्यमूर्ती, परम शक्तीमान आणि अशी अनेक विभूषणे असणारे सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले गुरुरूपात लाभले आहेत. केवढे हे आमचे परम भाग्य आहे ! याविषयी सप्तर्षि आणि महर्षि यांनी अनेक नाडीपट्ट्यांमध्ये ‘परात्पर गुरु डॉक्टर हे श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे सांगितले आहे.

त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यासाठी देवाने आपली निवड केली आहे. अशी संधी या ७५० कोटी लोकांमध्ये केवळ काही सहस्र लोकांनाच मिळाली आहे. हे सर्व पाहिले की, आपल्या लक्षात येईल की, आम्ही देवाचे लाडके आहोत !

२ इ. श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांसह साक्षात् महालक्ष्मीचा अवतार असणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ याही गुरुरूपात लाभणे अन् त्यांच्या रूपात भगवंतच साधकांच्या साधनेतील अडथळे दूर करत असणे : श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांंनी साक्षात् महालक्ष्मीचा अवतार असणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आपले ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून नेमलेे आहे. त्यामुळे त्याही आपल्याला गुरुरूपात लाभल्या आहेत. हे आपले किती मोठे परम भाग्य आहे ! असे भाग्य केवळ देवाचे लाडके असणार्‍या साधकांनाच मिळू शकते. श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरच नव्हे, तर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दोघीही साधकांची साधना चांगली व्हावी, त्यांच्या साधनेतील अडथळे दूर व्हावे, यांसाठी अथक आणि अहोरात्र प्रयत्नरत आहेत. त्यासाठी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या संपूर्ण भारतभर आणि विदेशात भ्रमण करून तेथील जागृत देवतांच्या मंदिरात जात आहेत. साधकांचे सर्व त्रास दूर होऊन त्यांच्याकडून चांगली साधना व्हावी, यासाठी जप, तप, अनुष्ठान, यज्ञयाग, देवाला साकडे घालणे इत्यादी करत आहेत, तर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात शेकडो यज्ञयाग, अनुष्ठाने आदी करत आहेत. तहान, भूक, झोप आदींचा विचार न करता दिवसरात्र साधकांच्या साधनेतील अडथळे दूर होऊन त्यांचे वेगाने मार्गक्रमण व्हावे, यांसाठी विविध माध्यमांतून अखंड मार्गदर्शन करत आहेत.

जर भगवंतच आपल्या साधनेतील अडथळे दूर करण्यासाठी अखंड प्रयत्नरत आहे, तर ‘आम्ही देवाचे लाडके आहोत’, हे सिद्धच होत आहे !

२ ई. एखादे शहर उद्ध्वस्त करण्याएवढी शक्ती असलेल्या मोठ्या अनिष्ट शक्तींपासून साधकांचे रक्षण भगवंतच करत असल्याने साधक जिवंत असून साधनारत असणे : कलियुगात ईश्‍वरप्राप्तीसाठी साधकांना पितृयानमार्गे प्रवास करावा लागतो. हा मार्ग सप्तपाताळातून जात असून या मार्गात स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर असंख्य अडथळे आहेत. अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास आहे. साधकांवर सतत मोठ्या अनिष्ट शक्तींची आक्रमणे होत असतात. एकेका मोठ्या अनिष्ट शक्तीचे सामर्थ्य एवढे आहे की, ती सहज एखादे शहर उद्ध्वस्त करू शकते. अशा मोठ्या अनिष्ट शक्तींनी आधीच्या काळात देवांनाही अनेक युद्धांमध्ये परास्त केलेे आहे. अशा शक्ती साधकांना पुष्कळ त्रास देतात.असे सर्व असूनही सनातनचे साधक जिवंत आहेत. केवळ जिवंतच नाही, तर सर्व भोग भोगून, अनिष्ट शक्तींनी दिलेल्या त्रासावर मात करत चांगल्या प्रकारे साधनाही करत आहेत. याचे कारण ‘भगवंतच साधकांचे अखंड रक्षण करत आहे’, याची ही अनुभूती आहे; कारण आम्ही देवाचे लाडके आहोत !

२ उ. ‘दिव्य ईश्‍वरी ज्ञानाचा योग्य उपयोग सनातनच करू शकते’, याची भगवंताला निश्‍चिती असल्याने त्याने अनमोल आणि दुर्मिळ असे ज्ञान देण्यासाठी सनातनची निवड केलेली असणे : जगात कुठेही उपलब्ध नसणारे दिव्य ईश्‍वरी ज्ञान देण्यासाठी देवाने सनातनची निवड केली आहे. जगात अध्यात्माचे कार्य करणार्‍या शेकडो, सहस्रोच नव्हे, तर लाखो संघटनाही असू शकतात; पण देवाने यासाठी त्यांची निवड केली नाही. केवळ सनातनच भगवंताने दिलेल्या या दिव्य ज्ञानाचा योग्य उपयोग करून ते समाजापर्यंत पोचवू शकते, याची निश्‍चिती प्रत्यक्ष भगवंतालाच असल्याने त्याने ते आपल्याला  उपलब्ध करून दिले आहे; कारण आपण देवाचे लाडके आहोत !

२ ऊ. सनातनच्या साधकांना प्रत्येक स्तरावर विरोध असल्याने विविध संकटे येऊनही भगवंत प्रत्येक वेळी साधकांचे रक्षण करत असल्याने सनातनचे कार्य अविरत चालू असणे : सनातनच्या साधकांना प्रत्येक स्तरावर विरोध आहे; परंतु आतापर्यंत कुणीही त्यांना साधनेपासून परावृत्त करू शकलेले नाही. देव अखंडपणे या सर्व संकटांपासून आपले रक्षण करत आहे; कारण आपण देवाचे लाडके आहोत !

२ ए. साधकांना सप्तलोक आणि सप्तपाताळ यांसंदर्भातील उच्च स्तराच्या अनुभूती देत असणे : साधकांना पुष्कळ उच्च स्तरावरील अनुभूती येतात, म्हणजेच सनातनचे साधक ‘सप्तलोक आणि सप्तपाताळ येथे काय चालू आहे ?’, याचे वृत्त घेऊ शकतात. ‘वेगवेगळ्या लोकांमध्ये फिरून (सूक्ष्मदेहाने) तेथील वातावरण कसे आहे ?’, हेही त्यांनी लिहिलेले आहे. ‘इतक्या उच्च प्रतीच्या अनुभूती सनातनच्या साधकांना कशा काय इतक्या सहजपणे येतात ?’, याचे सर्वसाधारणपणे समाजातील लोकांना आश्‍चर्य वाटते. ‘खरेच असे असू शकते का ?’, असे प्रश्‍नही त्यांच्या मनात निर्माण होतात. साधकांना आलेल्या अशा अनुभूतींच्या ग्रंथांचे अनेक खंड आपण प्रकाशित केले आहेत. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतूनही आपण या अनुभूती प्रसिद्ध करत असतो. या अनुभूती प्रसिद्ध करायला जागाही अल्प पडेल, एवढ्या मोठ्या प्रमाणावर साधकांना अनुभूती येतात.

‘अनुभूती म्हणजे देवाच्या अस्तित्वाची जाणीव !’ आणि ती कशामुळे होते, तर प्रत्यक्ष भगवंताच्या मार्गदर्शनाखाली साधक करत असलेल्या योग्य साधनेमुळे ! यावरूनही लक्षात येते की, आम्ही देवाचे लाडके आहोत !

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.११.२०२०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक