संभाजीनगर येथे वेळेवर वेतन देण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचे ‘ऑनलाईन’ आंदोलन चालू !

शिक्षकांचे ‘ऑनलाईन’ आंदोलन

संभाजीनगर – ‘गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचे वेतन नेहमीच अनियमित होत आहे. २-२ मास विलंबाने वेतन होत असल्यामुळे शिक्षकांना प्रचंड आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. यामुळे शिक्षकांचे वेतन मासाच्या पहिल्या दिनांकाला झाले पाहिजे’, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांनी एकत्र येत ‘ऑनलाईन’ आंदोलन चालू केले आहे.

गेल्या वर्षीपासून अधिकोषांचे कर्ज, मुलांचे शिक्षण, आजारपण अशा अनेक संकटांचा सामना शिक्षक करत आहेत. जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाला ‘वेतन सी.एम्.पी. प्रणालीद्वारे करा’, अशी मागणी केली; परंतु जिल्हा परिषदेचे प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. शिक्षकांच्या अडचणी समजून घेत नाही आणि सध्या कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे संघटनांचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेमध्ये अधिक वेळ जात नाहीत. त्यामुळे प्रशासनाने याचा लाभ घेतला. त्यामुळे वेतन आणखी विलंबाने होऊ लागले आहे, असा आरोप शिक्षकांकडून केला जात आहे.