पुणे – कोरोना महामारीच्या काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल २०२० एप्रिल २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत राज्यातील वेगवेगळ्या भागांतील एकूण ५६० विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणार्या विवाहांत बालविवाह रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच बालविवाह होतांना लक्षात आल्यास त्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अन्वये बालविवाह अवैध ठरतात. त्यामुळे त्या विरोधात गुन्हा नोंदवला जाणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. या कायद्याच्या कार्यवाहीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी नियुक्त केले असल्याचे ते म्हणाले.