चीनची गलवान खोर्‍यात युद्धसिद्धता !

घातक रॉकेट लाँचर आणि अन्य शस्त्र तैनात

चीनशी पुन्हा संघर्ष झाल्यास भारताने बचावात्मक पवित्रा न घेतला चीनवर प्रतिआक्रमण करून त्याला पराजित करण्यासाठीच प्रयत्न करावेत !

बीजिंग (चीन) – भारत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सामोरे जात असतांना चीनने पूर्व लडाखमधील सीमेवर युद्धाची सिद्धता केली आहे, असे दिसून येत आहे. चीनने घातकी आणि लांब पल्ल्यावर मारा करू शकणारे अत्याधुनिक ‘पी.एच्.एल्.-३’ हे रॉकेट लाँचर्स तिबेटच्या भारतीय सीमेजवळ तैनात केले आहेत. चीनची सरकारी दूरचित्रवाहिनी सीसीटीव्हीने याविषयीचे वृत्त दिले आहे. हे रॉकेट लाँचर्स भारतीय सीमेवर तैनात असलेल्या शिंजियांग कमांडकडे सोपवण्यात आले आहेत. सीसीटीव्हीच्या दाव्यानुसार हे रॉकेट ट्रकवरून वाहून नेता येऊ शकतात. तसेच ते पूर्णपणे संगणक संचलित आहेत. ते एकाच वेळी अनेक ठिकाणांना लक्ष्य करू शकतात.

१. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार हे रॉकेट लाँचर्स लडाख सीमेवर ५ सहस्र २०० मीटर उंचीवर तैनात करण्यात आले आहेत. याच भागात गेल्यावर्षी गलवानचा संघर्ष झाला होता.

२. हे रॉकेट लाँचर्स वेगाने तैनात केले जाऊ शकतात. या रॉकेट लाँचर्समुळे चिनी सैनिक तिबेटच्या पठारी भागात, वाळवंटी भाग आणि प्रत्येक ऋतूमध्ये युद्ध लढू शकतात. या रॉकेटची मारकक्षमता ही ६० किमी प्रति घंटे वेगाने १३० किमीपर्यंत आहे.

३. याव्यतिरिक्त चीनने लडाखमध्ये पुष्कळ हलक्या वजनाचे १५ रणगाडे, १८१ तोफा आणि पर्वतरांगांमध्ये उड्डाण करू शकणारे ड्रोन तैनात केले आहेत.