बक्सर (बिहार) येथेही गंगानदी किनारी वहात आले ४० हून अधिक मृतदेह !

अग्नीसंस्कारासाठी लाकडे मिळत नसल्याने नदीत सोडले जात आहेत मृतदेह !

राज्यातील प्रशासन झोपा काढत आहे का ? जर हे मृतदेह कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्यांचे असतील, तर याचे गांभीर्य अधिक आहे. जर अग्नीसंस्कारासाठी लाकडे मिळत नसतील, तर ती उपलब्ध करून देण्याचे दायित्व प्रशासनाचे आहे. ते पार न पाडणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

बक्सर (बिहार) – उत्तरप्रदेश आणि बिहार येथे गंगानदीमध्ये गेल्या २-३ दिवसांत अनेक मृतदेह सापडत आहेत. या मृतदेहांवर अग्नीसंस्कार करण्याऐवजी त्यांना नदीत सोडले जात आहे. परंपरेनुसार या राज्यांत असे केले जात असले, तरी आता ही संख्या पुष्कळ मोठी असल्याचे दिसून येत आहे. बक्सरच्या चौसामधील महादेव घाट येथे ४० हून अधिक मृतदेह वहात आले आहेत. मृत्यू पावलेल्या या लोकांना कोरोना झाला असल्याचा दावाही केला जात आहे; मात्र शवविच्छेदन केल्याविना याला दुजोरा देता येणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच बिहार प्रशासनाने हे मृतदेह बिहारमधील नसून उत्तरप्रदेशातून वहात आल्याचा दावा केला आहे.

१. येथील स्थानिक निवासी नरेंद्रकुमार मौर्य यांनी सांगितले की, या घाटावर प्रतिदिन १०० ते २०० जण मृतदेह घेऊन येतात; मात्र लाकडे नसल्याने अंत्यसंस्कार करता न आल्याने मृत कुटुंबियांचे नातेवाइक या मृतदेहांना नदीमध्ये सोडून देतात. प्रशासनाकडून हे रोखण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.

२. उत्तरप्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील नदीच्या किनारी अशाच प्रकारे मृतदेह वाहून आले आहेत. पूर्वी हमीरपूर आणि कानपूर जिल्ह्यांतही गंगानदी किनारी मृतदेह सापडले होते. उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांतील गावांमध्ये कोरोना चाचणीची सुविधा नसल्याने आणि डॉक्टरही उपलब्ध नसल्याने अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे, असे सांगण्यात येत आहे.