कोरोना नियंत्रणासाठी चीनने केले, तेच आता भारतानेही करावे !

अमेरिकचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांचा भारताला सल्ला

वॉशिंग्टन (अमेरिका) – जगभरातील देशांनी भारताला लस निर्मितीसाठी साहाय्य केले पाहिजे किंवा भारताला अधिकाधिक लसी दान दिल्या पाहिजेत. एका वर्षापूर्वी चीनने ज्याप्रकारे कोरोनासंदर्भात वापरासाठी रुग्णालये उभारली होती, तो आदर्श भारताने घेणे आवश्यक आहे. भारताला हे करावे लागेल, असा सल्ला अमेरिका सरकारचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांनी भारताला दिला आहे. ‘भारतातील रुग्णालयांत ऑक्सिजन, पीपीई किट्स आणि अन्य वैद्यकीय सामग्री आदींचा तुटवडा असून अमेरिकेने साहाय्यासाठी पुढे यायला हवे’, असेही त्यांनी म्हटले. एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा सल्ला दिला आहे.

डॉ. फाऊची पुढे म्हणाले की, भारताने संपूर्ण दळणवळण बंदी केली, तरच हा प्रश्‍न सुटू शकेल. गेल्या वर्षी चीनने तेच केले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, तसेच इतर देशांनी मर्यादित प्रमाणात का होईना; पण दळणवळण बंदी केली. भारताला त्यासाठी ६ मासांच्या दळणवळण बंदी करण्याची आवश्यकता नाही, तर केवळ काही आठवडे ती केली तरी त्याचा परिणाम दिसून येईल.