निष्क्रीय प्रशासन !
नागपूर – पूर्वी फळे आणि आईस्क्रीम यांची विक्री करणारा चंदन चौधरी याने कोरोना संकटाच्या काळात स्वतःला आधुनिक वैद्य असल्याचे खोटे भासवून रुग्णालय चालू केले. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (चौधरी याने रुग्णालय चालू केल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन आणि आरोग्यधिकारी यांनी तो खरोखर आधुनिक वैद्य आहे का ? हे पडताळले असते, तर त्याच्याकडून होणारी अनेक रुग्णांची फसवणूक टाळता आली असती. प्रशासनाच्या बेफिकीरीमुळेच अशा बनावट आधुनिक वैद्यांचा सुळसुळाट झाला आहे. – संपादक)
आरोपी चौधरी याने इलेक्ट्रिशियनचे काम करण्यासमवेत गेल्या ५ वर्षांपासून तो ‘नारायण मल्टीपर्पज सोसायटी’ या नावाने रुग्णालय चालवत होता. येथे येणार्या रुग्णांवर तो स्वतः आधुनिक वैद्य असल्याचे भासवून आयुर्वेदीय आणि निसर्गोपचार करत होता. त्याने कोविड रुग्णांवरही उपचार चालू केले होते. चौधरी याच्या ओळखीतील एका व्यक्तीने पोलिसांकडे या प्रकाराची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या रुग्णालयातून ऑक्सिजन सिलिंडरसह इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले.