सातारा येथे ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केंद्रावर नुसतेच हेलपाटे !

सातारा, ८ मे (वार्ता.) – ४५ वर्षे वयावरील नागरिकांचा लसीकरणाचा टप्पा पूर्ण होण्याआधीच १८ ते ४४ वर्षे या वयोगटातील लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध होईल, तसे लसीकरण केले जात आहे. लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक पहाटे ६ वाजल्यापासून लसीकरण केंद्रावर रांगेत उभे रहात आहेत. परिचारीका सकाळी ८ वाजता येतात आणि लस उपलब्ध नसल्याचा निरोप नागरिकांना देतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरापासून लसीकरण केंद्रापर्यंत नुसतेच हेलपाटे मारायची वेळ आली आहे.
लसीकरण केंद्रावरील आरोग्य कर्मचारी काही विचारले, तरी नीट बोलत नाहीत, अशाही तक्रारी आहेत. हेलपाटे मारण्याऐवजी दूरभाष करून लसीकरणासाठी येऊ का ?, असे विचारल्यावर दूरभाष बंद असल्याचे कारण कर्मचार्‍यांकडून दिले जात आहे. दळणवळण बंदी असल्यामुळे चौका-चौकात पोलिसांनी फलक लावले असून तपासणी करत आहेत. त्यामुळे विविध अडचणी आणि चौकशा झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रापर्यंत पोचत आहेत; मात्र लस न मिळाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लसींच्या उपलब्धतेविषयी काही माहिती मिळाल्यास नागरिकांना नुसतेच हेलपाटे मारावे लागणार नाहीत, हे निश्‍चित !