कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक आयुष ६४ हे औषध प्रभावकारी !

वार्ता – कोरोनाग्रस्तांवर केंद्र सरकारने निश्‍चित केलेल्या उपचारपद्धतीमध्ये आयुर्वेदिक आयुष ६४ या औषधाचा समावेश करण्यात आला आहे. या औषधावर झालेल्या संशोधनातून सौम्य आणि मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांवर हे औषध उपयुक्त ठरत असून त्यामुळे वेगाने आजार बरा होतो. या औषधामुळे रुग्ण गंभीर होण्यापासून वाचतो, तसेच हे औषध सुरक्षित आणि परिणामकारक ठरले आहे, असे निष्कर्ष या संशोधनातून समोर आले आहेत.

आयुष मंत्रालय आणि वैज्ञानिक, औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सी.एस्.आय.आर्.) संयुक्त संशोधनातून आयुष ६४ हे औषध कोरोनाग्रस्तांवर उपयुक्त ठरत आहे. आयुष मंत्रालयाचे नॅशनल रिसर्च प्रोफेसर तसेच इंटर डिसिप्लनरी आयुष रिसर्च अँड डेव्हलपमेंट टास्क फोर्स ऑन कोविडचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन तसेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आय.सी.एम्.आर्.चे) माजी संचालक डॉ. व्ही.एम्. कटोच यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत माहिती दिली. मलेरियाच्या आजारावर वर्ष १९८० मध्ये आयुष ६४ हे आयुर्वेदिक औषध विकसित करण्यात आले होते. त्या औषधाचा पुन्हा वापर करण्यासाठी मुंबई, वर्धा आणि लखनौ येथील मोठ्या ३ रुग्णालयांमध्ये २१० रुग्णांवर जागतिक पद्धतीने क्लिनिकल ट्रायलनुसार चाचणी घेण्यात आली होती.