कोरोनामध्ये दूध चालते का ?

कोरोनामध्ये दूध चालत नाही. का ? दूध तर पौष्टीक आहे ना ? मग काही झाले, तर आपण हळद-दूध देतो ना ? आपण दूध-हळद देतो, ती स्वस्थ व्यक्तीला आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी. ज्याला कुठलाही आजार नाही, त्याला दूध पचते आणि ते पचले, तरच त्यातून शक्ती, जीवनसत्त्व आदी मिळते. त्याच्या पचन प्रक्रियेनंतरच ते आपणास उपयोगी पडते.

मग दूध कोरोनामध्ये का नको ? मुळातच दूध आणि तत्सम पचण्यास जड पदार्थ हे कोरोनाच काय, तर कुठल्याही तापात चालत नाहीत (काही अपवाद वगळता); कारण तापात आपला अग्नी म्हणजे पचन शक्ती ही मंद पडलेली असते आणि त्यातून शरिरास चांगले घटक उत्पन्न होऊ शकत नाही, किंबहुना न पचलेले दूध आणि जड पदार्थ हे उलट कफ वाढवण्यास साहाय्य करतात.

आयुर्वेदानुसार आजार झाल्यावर विशेषत: ताप आल्यावर अत्यंत हलके आहार द्यावेत, शक्यतो स्वतःची शक्ती, वय आणि क्षमतेनुसार लंघन करावे. लंघन म्हणजे अतिशय मोजके, अंगी पचण्यास हलके, गरम आणि शिजवलेले पदार्थ द्यावेत. जसे मूग (मुगाचे कढण), लाह्या, ज्वारीची भाकरी, दलिया इत्यादी भुकेनुसार हळूहळू आहार वाढवावा, जेणेकरून तो अंगी लागतो.

– वैद्य अमित मकवाना, वेदामृत आयुर्वेद, श्रीरामपूर, नगर.