विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराचा दुष्परिणाम !
निवडणूक आयोग आणि सर्वपक्षीय नेते यास उत्तरदायी असल्यामुळे ते यासाठी प्रायश्चित्त घेणार का ?
कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये गेल्या मासाभरापासून ८ टप्प्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये घेण्यात आलेल्या या निवडणुकीमुळे कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड गतीने वाढत असल्याचे दिसून येत आहे. बंगालची राजधानी कोलकातामध्ये आर्टीपीसीआर् तपासणी करणारी प्रत्येक दुसरी व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे आढळून येत आहे. राज्यात अन्य ठिकाणी प्रत्येकी ४ पैकी एक जण बाधित असल्याचेही समोर आले आहे. हे प्रमाण एका मासामध्ये ५ पटींनी वाढले आहे. एका सरकारी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लोक कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण यापेक्षा अधिक आहे. लक्षण नसलेल्या लोकांची संख्या अधिक आहे. असे लोक तपासणी करत नसल्याचे समोर आले आहे.
एक मासापूर्वीच निवडणूक आयोगाला नोटीस पाठवून जाहीर सभांवर बंदीची केली होती मागणी !
उत्तरप्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंह म्हणाले की, आम्ही एक मासापूर्वी निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली होती. बंगालमध्ये कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केले जात आहे, असे निदर्शनास आणून दिले होते. जाहीर सभांवर बंदी घाला, अशी मागणी आम्ही तेव्हा केली होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आयोगाने योग्य वेळी पावले उचलली असती, तर ही वेळ आली नसती.