रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची बैठक घ्या ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

जिल्हाधिकारी दौलत देसाई (उजवीकडे) यांच्याशी चर्चा करतांना राजेश क्षीरसागर (उजवीकडे)

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्ण आणि नातेवाईक यांची आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची बैठक घेण्यात यावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे २३ एप्रिल या दिवशी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी श्री. क्षीरसागर यांनी या सूचना दिल्या.

श्री. क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील ३६ जिल्ह्यांच्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यास रेमडेसिवीरचा पुरवठा मात्र ०.७४ टक्के इतका अल्प आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आवश्यक पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करावा. आजची परिस्थिती पहाता प्रतिदिन सहस्रांच्या संख्येत रुग्णांची वाढ होत आहे. ही परिस्थिती प्रशासनाच्या आवाक्याबाहेर जाऊ नये, यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने दायित्व घेऊन दसरा चौक येथे स्वतंत्र पडताळणी केंद्र उभे करावे. या केंद्रातून रुग्णांचे विलगीकरण करून, अत्यावश्यक रुग्णांना रुग्णालयात भरती करावे.’’