सातारा येथील कोविड डिफेंडर्स ग्रुपच्या सदस्यांनी केली नागरिकांना पाया पडून मास्क घालण्याची विनवणी !

समाजसेवा करणार्‍यांना नागरिकांनी मास्कचा वापर योग्य पद्धतीने करा, असे पाय धरून सांगावे लागणे, हे जनतेसाठी लज्जास्पद आहे. अशी जनता धरणीसाठी भारच आहे, असा विचार सुज्ञ नागरिकांच्या मनात आल्यास चूक ते काय ?


सातारा, २५ एप्रिल (वार्ता.) – प्रशासनाने वेळोवेळी आवाहन करूनही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यातील काहीजण मास्क उपयोगात आणत नाहीत. त्यामुळे मास्कचे महत्त्व लोकांच्या लक्षात यावे, यासाठी येथील कोविड डिफेंडर्स ग्रुपच्या वतीने मास्कचा उपयोग करण्यासाठी नागरिकांच्या पाया पडून त्यांची मनधरणी करत आहेत.

गत आठवड्यापासून कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. तसेच मृत्यूदरही चिंता वाढवणारा आहे. तरी नागरिक दायित्वशून्यपणे वागत आहेत. विनामास्क रस्त्यावर फिरणे, मास्क नाकाखाली हनुवटीवर ठेवणे, सामाजिक अंतर न पाळणे, रस्त्यावरच थुंकणे या गोष्टी घडत असल्याने कोरोनाला अधिकच बळ मिळत आहे. याला पायबंद घालण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत कोविड डिफेंडर्स ग्रुपकडून हातात ध्वनिक्षेपक घेऊन जनप्रबोधन चालू केले. या वेळी मास्क न लावणार्‍या किंवा योग्य प्रकारे न लावणार्‍या नागरिकांना पाया पडून व्यवस्थित मास्क लावण्यासाठी विनंती करण्यात आली. कोविड डिफेंडर्स ग्रुपकडून चालवलेल्या या मोहिमेची चर्चा संपूर्ण शहरामध्ये होत आहे.