यवतमाळ, २४ एप्रिल (वार्ता.) – बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने शेतकरी, बियाणे आस्थापनांचे प्रतिनिधी, कृषी निविष्ठा विक्रेते यांच्या अडचणी आणि तक्रारी यांचे वेळेत निराकरण व्हावे, तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीत सदर निविष्ठांचा काळाबाजार आणि साठेबाजी थांबण्यासाठी त्यांचे उत्पादन, वितरण तसेच विक्री नियंत्रित करणे आवश्यक आह. त्याअनुषंगाने बियाणे, खते आणि कीटकनाशके यांची गुणवत्ता, तसेच पुरवठ्यात येणार्या अडचणींचे तात्काळ निराकरण होण्यासाठी खरीप हंगामाच्या दृष्टीने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.
नियंत्रण कक्षात प्रतिदिन सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संपर्क साधण्यासाठी दत्तात्रय आवारे (९७६७०७१९०६), शिवा जाधव (९४०५१४०१५०), मोरेश्वर यंबडवार (९२८४४९६१११), विनोद चव्हाण (९२८४२२२१२५), अमित कोटे (८८३०११७०९५) या ५ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित तक्रारदारांनी उपरोक्त भ्रमणभाष क्रमांकांवर कृषी निविष्ठांच्या अडचणींविषयी तक्रारी नोंदवतांना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि तक्रारीचा संक्षिप्त तपशील द्यावा किंवा ती माहिती कोर्या कागदावर लिहून त्याचे छायाचित्र ‘व्हॉट्सअॅप’वर पाठवावे. ज्या शेतकर्यांना ‘व्हॉट्सअॅप’चा वापर करणे शक्य नसेल, त्यांनी उपरोक्त क्रमांकावर तोंडी तक्रारी नोंदवाव्यात, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कळवले आहे.