संभाजीनगर येथे पोलीस उपनिरीक्षकाची हवालदार प्रेयसीच्या साहाय्याने पत्नीला मारहाण !

पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दोघांना केले निलंबित !

संभाजीनगर – ग्रामीण वाहतूक विभागातील देवराव रंगारी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड यांनी महिला पोलीस हवालदार असलेल्या प्रेयसीसमवेत स्वतःच्या घरी जाऊन पत्नीला मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड यांचे त्यांच्या विभागातील महिला पोलीस हवालदाराशी २ वर्षांपासून प्रेमप्रकरण चालू होते. पत्नीच्या तक्रारीवरून शैलेश जोगदंड आणि त्यांची प्रेयसी यांच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दोघांना पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निलंबित केले आहे. (पोलीस अधिकारीच अशा प्रकारचे वर्तन करत असतील तर ते समाजाचे रक्षण काय करणार ? पोलिसांच्या अशा वागण्यानेच पोलीस खाते अपकीर्त होत आहे. या प्रसंगातून नैतिकतेचे धडे पोलिसांना शिकवण्याची वेळ आली आहे, असेच म्हणावे लागेल. – संपादक) 

शैलेश यांचा पत्नीसमवेत २ वर्षांपासून वाद चालू आहे. ते प्रेयसी समवेतच रहात होते. १३ एप्रिल या दिवशी सकाळी ६ वाजता हवालदार महिला बळजोरीने पीडितेच्या घरात आली. तिला जातीवाचक शिवीगाळ करून दूरदर्शन संच आणि आरसा फोडला. नंतर तिला मारहाण करून खाली पाडले. शैलेश यांनी पत्नीचे हात-पाय पकडून खोलीत ओढत नेले आणि दोघांनी मिळून तिला अमानुष मारहाण केली. नंतर ‘तुला येथेच जाळून टाकू, चाकूने गळा कापू’, असे धमकावले. त्यानंतर पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. १६ एप्रिल या दिवशी विविध गंभीर कलमांद्वारे आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक शारदा लाटे करत आहेत.