मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई – कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावे, म्हणजे गरीब आणि दुर्बल व्यक्तींना दळणवळण बंदीकाळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसाहाय्य करण्यास मान्यता मिळेल, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
या पत्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे,
१. राज्यात आतापर्यंत ५ लाख ६४ सहस्र कोरोनाबाधित रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा ही चिंताजनक गोष्ट आहे. राज्याला १ सहस्र २०० मेट्रिक टनहून अधिक ऑक्सिजनच्या उत्पादनाची आवश्यकता आहे.
२. देशाच्या पूर्व आणि दक्षिण भागांतून स्टील प्रकल्पांतून ऑक्सिजन घेण्यास केंद्रशासनाने मान्यता दिली आहे; मात्र वेळ वाचवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती कायद्याच्या अंतर्गत ऑक्सिजन प्रामुख्याने हवाईमार्गे आणण्यासाठी तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.
३. ‘इंडियन पेटंट अॅक्ट १९७०’ च्या कलम ९२ नुसार ‘रेमडेसिविर’च्या निर्यातदारांना कायमस्वरूपी अनुमती द्यावी, म्हणजे हे औषध स्थानिक बाजारपेठेत विकता येईल.
४. दळणवळण बंदीच्या काळात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना प्रती प्रौढ व्यक्तीला नियमित १०० रुपये आणि मुलांना प्रत्येकी ६० रुपये सानुग्रह अर्थसाहाय्य करण्यास राज्यशासनाला अनुमती द्यावी.
५. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मिळाल्यास कोरोनाशी लढण्यास आर्थिक साहाय्य होईल.
६. अनेक लघु उद्योग, नवीन उद्योग यांनी केंद्रशासनाच्या विविध योजनांत अधिकोषांकडून कर्ज घेतली आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांच्यावर आर्थिक ताण येत आहे. त्यामुळे ‘चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत त्यांच्याकडून कर्जाचे हप्ते स्वीकारण्यात येऊ नयेत’, अशी अधिकोषांना सूचना देण्यात यावी.
७. लहान व्यापारी आणि उद्योग अडचणीत आहेत. त्यामुळे मार्च आणि एप्रिल मधील वस्तू अन् सेवा कर परताव्याचा कालावधी ३ मास वाढवून मिळावा.