पॉस्को न्यायालयाने आरोपीला बलात्कारी ठरवल्याचा निकाल पाटणा उच्च न्यायालयाकडून रहित

न्यायाधिशांना प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे उच्च न्यायालयाचे प्रतिपादन !

पाटणा उच्च न्यायालय

पाटलीपुत्र (बिहार) – येथील पाटणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल पालटत ‘न्यायाधिशांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे’ असे म्हटले आहे. ‘पॉस्को’ न्यायालयाने बलात्काराचा प्रयत्न करणार्‍याला १० वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच त्याला आर्थिक दंडही ठोठावला होता.

१. पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीरेंद्र कुमार यांच्या न्यायालयात या निकालाला आव्हान देण्यात आल्यावर न्यायालयाला आढळले की, आरोपीवरील आरोप सिद्ध होत नाही. त्यामुळे न्यायालयाने पॉस्को न्यायालयाचा निर्णय रहित केला. उच्च न्यायालयाने पास्को न्यायालयाच्या न्यायाधिशांनी निकालामध्ये श्‍लोक आणि जगजीत सिंह यांच्या गझलचा उल्लेख करण्यावरही अप्रसन्नता व्यक्त केली.

२. न्यायालयाने म्हटले की, कनिष्ठ न्यायालयाच्या न्यायाधिशांकडे फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार असतो. त्यामुळे त्यांना कायद्याच्या बाजूची खोलवर माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे ते त्यांचा निर्णय अधिक दायित्वाने देऊ शकतात. माहितीच्या अभावामुळे संबंधिताला अनावश्यक अन्याय सहन करावा लागतो. अशांना बिहार ज्यूडिशियस अ‍ॅकेडमी येथे पाठवले पाहिजे. तेथे ते कायद्याचे योग्य शिक्षण मिळेल आणि ते पुन्हा चुका करणार नाहीत.