२९.१२.२०१९ या दिवसापासून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये काही साधकांंच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत आहेत. हा आढावा चालू होण्यापूर्वी सर्व साधकांची व्यष्टी साधना अनियमित आणि अपूर्ण होती. साधक सवलत घेत होते. त्यामुळे स्वभावदोष निर्मूलनाचे प्रयत्न आणि सत्र संख्या पूर्ण होत नव्हती. भावजागृतीचे प्रयत्नही केले जात नव्हते. ‘साधकांची व्यष्टी साधनेची घडी बसून त्यांची चांगली साधना व्हावी’, यासाठी सद्गुरु स्वातीताईंनी प्रतिदिन त्यांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेण्यास आरंभ केला. तेव्हा त्या साधकांमध्ये पुष्कळ पालट जाणवू लागले. ‘व्यष्टी साधना हाच समष्टी साधनेचा पाया आहे’, याची त्यांना जाणीव झाली. व्यष्टी साधनेचे प्रयत्न प्रतिदिन होऊ लागल्यावर त्यांची समष्टी सेवेची फलनिष्पत्तीही वाढली.
साधकांची आढावा चालू होण्यापूर्वीची स्थिती आणि व्यष्टी साधनेचा आढावा नियमित चालू झाल्यानंतर त्यांच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.
१. कु. अश्विनी पैलवान, सोलापूर – भावपूर्ण नामजप होऊ लागल्याने उत्साह वाढून शारीरिक त्रास न्यून होणे
अ. ‘पूर्वी मला दिवसभर सेवा झाल्यावर रात्री पुष्कळ थकवा जाणवायचा. आढावा चालू झाल्यानंतर नामजप करतांना मी शरिराचा प्रत्येक अवयव आणि इंद्रिये यांच्यावर नामजप लिहू लागले. ‘त्यामुळे ईश्वराचे चैतन्य देहात जात आहे’, असा भाव निर्माण होऊन शारीरिक त्रास न्यून झाले. आता रात्री सेवा संपण्यास कितीही उशीर झाला, तरी माझा उत्साह टिकून राहातो.
आ. स्वयंसूचना सत्र भावपूर्ण आणि नियमितपणे केल्यामुळे अंतर्मनाला स्वभावदोष अन् अहं यांची जाणीव होऊन ते न्यून करण्याचे प्रयत्न वाढले आहेत. त्यामुळे भावस्थिती टिकून रहाण्यास साहाय्य झाले.
इ. पूर्वी शारीरिक त्रास झाल्यावर मनाची स्थिती नकारात्मक व्हायची; परंतु आता कितीही त्रास झाला, तरी मनाची स्थिती सकारात्मक असते. त्यामुळे नैराश्याचे प्रमाणही न्यून झाले आहे.
ई. आता सेवा अल्प कालावधीत पूर्ण होत आहे. पूर्वी मला काही गोष्टी प्रयत्नपूर्वक आणि संघर्ष करून पूर्ण कराव्या लागायच्या; परंतु आता देवाचे साहाय्य मिळाल्याने अनेक गोष्टी सहज आणि अल्प कालावधीत पूर्ण होतात. पूर्वी एका वेळी अनेक सेवा आल्यावर माझ्या मनावर पुष्कळ ताण यायचा; परंतु आता ‘देवच सर्व करवून घेणार आहे’, या विचाराने ताण येत नाही.’
२. सौ. संगीता कडूकर, कोल्हापूर – अंतर्मुखता वाढून मनातील विचारांचे प्रमाण उणावणे आणि स्वभावदोषांची तीव्रता न्यून होणे
अ. ‘पूर्वी मी व्यष्टी साधनेला महत्व देत नव्हते आणि ती पूर्ण करत नव्हते. माझे भावाचे प्रयत्न अल्प होत असल्यामुळे मला मरगळ यायची. पहिले ४ दिवस व्यष्टी साधना पूर्ण करण्यासाठी मला पुष्कळ संघर्ष करावा लागला; परंतु आता त्यात नियमितपणा आला आहे.
आ. माझी अंतर्मुखता वाढली असून मनातील विचारांचे प्रमाण उणावले आहे. माझ्यातील ‘चालढकलपणा आणि सवलत घेणे’ या स्वभावदोषांची तीव्रता न्यून झाली आहे.
इ. नामजप करतांना ‘मी कापराच्या डोंगरावर आहे आणि साक्षात् शिव माझ्यासमोर उभा आहे’, असा भाव ठेवल्यामुळे माझा भाव जागृत होतो. परात्पर गुरु डॉक्टरांविषयीच्या कृतज्ञताभावात वाढ झाली आहे.
ई. साधकांविषयी प्रेमभाव वाढला असून माझी समष्टी सेवेची तळमळ, तसेच साधकांमधील संघटित भाव वाढला आहे.
उ. अनुभूती – आढावा घेतांना सद्गुरु स्वातीताई भावाचे प्रयत्न सांगतात. त्या वेळी ‘देवीच मला मार्गदर्शन करत आहे’, असे वाटून माझी भावजागृती होते.’
३. कु. शिवानी शिंदे, सातारा – अंतर्मुखता वाढल्यामुळे मनाच्या स्तरावरील चुकांचे निरीक्षण वाढणे आणि मनातील अपेक्षांचे विचार न्यून होणे
अ. ‘पूर्वी मला शारीरिक त्रासामुळे पुष्कळ थकवा यायचा. आता माझा उत्साह वाढला आहे.
आ. मी भावजागृतीचे प्रयत्न करत होते; परंतु मला त्यात भाव अनुभवता येत नव्हता. साधनेचे गांभीर्य वाढल्याने मला भावप्रयत्नांचा आनंदही मिळू लागला आहे.
इ. माझी अंतर्मुखता वाढल्यामुळे मनाच्या स्तरावरील चुकांचे निरीक्षण वाढले आणि चुका लक्षात येऊन त्यावर मात करता येते.
ई. पूर्वी मी साधकांकडून पुष्कळ अपेक्षा करत असे. त्यामुळे माझ्या मनात लगेच प्रतिक्रिया यायच्या. माझ्या मनात साधकांविषयी पूर्वग्रहही होते. त्यामुळे मी साधकांशी औपचारिक आणि मोजकेच बोलायचे; परंतु आता पूर्वग्रह न्यून झाले असून मनातील अपेक्षांचे विचारही न्यून झाले आहेत.’
४. श्री. रमेश लुकतुके, मिरज – सर्वांमध्ये मिळून मिसळून रहाण्याचा भाग वाढणे आणि ‘दिसेल ते कर्तव्य’ ही जाणीव होऊन कृती होऊ लागणे
अ. ‘सहसाधकांचे प्रयत्न ऐकल्यावर माझा उत्साह वाढतो. नवनवीन सूत्रे शिकायला मिळतात; म्हणून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त होते. उत्साह वाढल्यामुळे मला दिवसभर थकवा जाणवत नाही.
आ. माझा एकलकोंडेपणा न्यून झाला अन् मला सर्वांमध्ये मिळून मिसळून रहाता येऊ लागले आहे. माझा मनोराज्यात रमण्याचा भागही उणावला आहे.
इ. मला आश्रमात सांगितलेली कोणतीही सेवा लगेच स्वीकारता येते आणि माझ्याकडून ती करण्याचा प्रयत्न होतो. सेवा करतांना मी ‘श्री गुरूंची सेवा करत आहे’, असा भाव असतो. ‘दिसेल ते कर्तव्य’ याची जाणीव होऊन तशी कृती होेते. ‘देवच सेवेतील अडचणी लक्षात आणून देतो आणि त्या सुधारूनही घेतोे’, असे जाणवते.’
५. डॉ. नरेंद्र दाते, पुणे – व्यष्टी आणि समष्टी साधनेचे दिलेले ध्येय पूर्ण करण्याचे प्रयत्न वाढणे
अ. ‘पूर्वी माझ्या इतरांकडून अपेक्षा असायच्या आणि त्यांना न्यून लेखण्याचा भाग व्हायचा. ‘मला सर्व कळते’, असा अहंचा पैलू अधिक असल्यामुळे देवाचे साहाय्य घेण्याचा भागही अल्प होता आणि बुद्धीच्या स्तरावर सर्व विचार होत होते. आता व्यष्टी आढाव्यामुळे त्यात पालट झाले आहेत.
आ. व्यष्टी आणि समष्टी साधनेचे दिलेले ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न वाढले आहेत.’
६. सौ. ज्योती दाते, पुणे – ‘गुरुदेवच सर्व करून घेणार आहेत’, अशी श्रद्धा निर्माण होऊन स्वतःमध्ये स्थिरता जाणवू लागणे
६ अ. स्वतःमध्ये जाणवणारे पालट
१. ‘पूर्वी व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले न केल्यामुळे मनावर एक प्रकारचे दडपण येऊन मला अपराधी वाटायचे. ‘व्यष्टी साधना पूर्ण केली नाही, तर शिक्षा होणार’, या भीतीने ‘ती पूर्ण करावी’, असे विचार असायचे; परंतु आता ‘प्रयत्न करावेत’, असे मनापासून वाटते.
२. सेवा करतांना मनात स्वकौतुकाचे विचार असायचे. सेवा बुद्धीच्या स्तरावर होऊन कर्तेपणाचे विचार अधिक असायचे. आता मनातील अनावश्यक विचारांचे प्रमाण उणावले आहे.
३. ‘कितीही अडचणी आल्या, तरी गुरुदेवच सर्व करून घेणार आहेत’, अशी श्रद्धा माझ्या मनात निर्माण झाली आहे. आता मला स्वतःमध्ये एक प्रकारची स्थिरता जाणवते.
४. पूर्वी प्रतिमा जपत असल्यामुळे मी उत्तरदायी साधकांना स्वतःच्या चुका सांगत नव्हते. आता तत्त्वनिष्ठतेने चुका सांगण्याचा प्रयत्न करते.
६ आ. सौ. ज्योती दाते यांना इतर साधकांमध्ये जाणवलेले पालट
६ आ १. सौ. शारदा हुमनाबादकर : आढावा नियमित चालू झाल्यापासून त्यांचे भावजागृतीचे प्रयत्न वाढले आहेत. नकारात्मक विचारांवर मात करण्याचे त्यांचे प्रयत्नही वाढले आहेत.
६ आ २. सौ. मीना धुमाळ : आता त्या भावाच्या स्तरावर प्रयत्न करतात. त्यामुळे ‘भीती वाटणे आणि आत्मविश्वासाचा अभाव’ या स्वभावदोषांवर त्यांच्याकडून प्रामाणिकपणे प्रयत्न होतांना दिसतात.
६ आ ३. श्री. मोहन चतुर्भुज : चतुर्भुजकाका सकाळी लवकर उठून नियमित व्यष्टी आढावा देतात. त्यामुळे आता ते परिस्थिती स्वीकारायला लागले आहेत. ते प्रतिदिन सांगितलेले सर्व प्रयत्न पूर्ण करतात.
६ आ ४. श्री. विलास पाटील : आता पाटीलकाकांची सेवा स्वीकारण्याची वृत्ती वाढली आहे. स्वतःचा विचार न करता तळमळीने सेवा करण्याचे त्यांचे प्रयत्न वाढले आहेत.’
७. सौ. शारदा हुमनाबादकर – मनातील अनावश्यक विचार न्यून होऊन ‘अधिकाधिक वेळ नामजप करावा’, असे वाटणे
अ. ‘माझ्या मनातील अनावश्यक विचार न्यून झाले आहेत. पूर्वी नामजप करतांना झोप यायची आणि ‘नामजपाची वेळ कधी संपते ?’, यासाठी सतत घड्याळाकडे पाहिले जायचे. आता ‘अधिकाधिक वेळ नामजप करावा’, असे वाटते.
आ. पूर्वी आधी सेवा केली जायची आणि वेळ मिळेल, तशी व्यष्टी साधना करायचे. आता ठरवलेल्या वेळेत व्यष्टी साधना करून नंतरच सेवेला प्रारंभ करते.’
८. सौ. प्रार्थना परब, कुडाळ – यजमानांकडून असलेल्या अपेक्षा न्यून होऊन सहसाधकांना साहाय्य करण्याचा भाग वाढणे
अ. ‘पूर्वी मी कार्याला प्राधान्य देत होते. त्यामुळे ‘नामजप करण्यास वेळ मिळत नाही’, असे सांगून सवलत घेत होते. आता तातडीची सेवा असली, तरी २ घंटे नामजप पूर्ण करते आणि नंतर सेवेला जाते.
आ. पूर्वी माझी यजमानांकडून अपेक्षा असायची. आता ती न्यून झाली आहे.
इ. पूर्वी माझा सेवा लगेच स्वीकारण्याचा भाग अल्प होता. आता सेवा लगेच स्वीकारली जाते. सहसाधकांना साहाय्य करण्याचा भागही वाढला आहे.’
९. सौ. मीना धुमाळ, गोवा – स्वभावदोष न्यून होऊन भावस्थिती अनुभवता येऊ लागणे आणि समष्टीचा विचार वाढणे
अ. ‘व्यष्टी आढाव्यामुळे माझ्यातील अपेक्षा करणे, कर्तेपणा घेणे, इतरांना समजून न घेणे, तसेच परिस्थिती न स्वीकारणे, यांसारखे स्वभावदोष न्यून होण्यास साहाय्य झाले आहे. मला परिस्थिती स्वीकारता येऊ लागली आहे.
आ. इतके दिवस मला व्यष्टी आणि समष्टी साधनेेतील भाव अनुभवता आला नव्हता. तो आता अनुभवता येतो.
इ. पूर्वी मला चुका सांगतांना भीती वाटायची. आता चुका मनापासून स्वीकारून त्या सांगण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे.
ई. आता मला समष्टीचा विचार करता येऊ लागला आहे. स्वतःकडे असलेल्या सेवा अल्प वेळेत पूर्ण करून मला इतरांना साहाय्य करणे जमू लागले आहे. ‘समष्टी सेवेतील आनंद इतरांनाही मिळावा’, अशी तळमळ माझ्या मनाला लागली आहे.
असे सर्व प्रयत्न होत असतांना मला सुचलेल्या चार ओळी गुरुचरणी अर्पण करते.
गुरुचरणी सर्वस्व अर्पण करता रोम रोम कृतज्ञ झाले ।
गुरुदेव माझ्या जीवनी आले ।
त्यांनी मला अंतर्बाह्य पालटले ॥ १ ॥
स्वभावदोष अन् अहं न्यून करून साधनेचा लाभ दिला ।
श्री गुरुकृपेने मनी आनंद अन् उत्साह भरला ॥ २ ॥
भावपूर्ण सेवेने घराचा आश्रम जाहला ।
समष्टीला आनंद देण्या तळमळ लागली मना ॥ ३ ॥
जीवनपथ सोपा अन् सुंदर जाहला ।
मन निर्मळ झाले गुरुचरणी जाण्या ॥ ४ ॥
गुरुचरणी सर्वस्व अर्पण करता रोम रोम कृतज्ञ झाले ।
अन् तन-मन माझे श्री गुरुचरणी विसावले ॥ ५ ॥’
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |