लहान-थोर सर्वांशी आदराने वागणारे आणि इतरांना साधनेत साहाय्य करणारे श्री. मेहुल राऊत !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा (१३.४.२०२१) या दिवशी श्री. मेहुल राऊत यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. मेहुल राऊत

श्री. मेहुल राऊत यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. सर्वांशी आदराने वागणे

‘मेहुलदादा प्रत्येक साधकाला आदराने हाक मारतो. तोे त्यांच्याहून लहान असणार्‍या साधकांनाही ‘ताई’ किंवा ‘दादा’ असे संबोधतो. एकदा मी त्याला विचारले, ‘‘मी तुझ्यापेक्षा लहान असूनही तू मला ‘ताई’ का म्हणतोस ?’’ तेव्हा त्याने सांगितले, ‘‘मी लहान असतांना एकदा सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी मला सांगितले, ‘‘प्रत्येक व्यक्तीत देव असतो आणि सर्वांशी आदराने बोलणे-वागणे हे चांगले संस्कार आहेत.’’ त्यामुळे लहानपणापासूनच मी सर्वांना आदरार्थी संबोधतो.’’

कु. अमृता मुद्गल

२. जवळीक साधणे

मी मेहुलदादाला सर्व गोष्टी हक्काने सांगू शकते. मी त्याला माझ्याकडून झालेल्या चुका किंवा एखादा प्रसंग सांगितल्यावर दादा ‘माझी चूक किती टक्के आहे ? आणि मी त्यावर कसे प्रयत्न करायला हवे ?’, याविषयी मला सांगतो. त्यामुळे मला अंतर्मुख व्हायला साहाय्य होते.

३. तत्परता

दादा तत्परतेने सेवा करतो. त्याला सेवेसाठी रात्री उशिरा भ्रमणभाष केला, तरी तो मला सेवेत साहाय्य करतो. एकदा एक संत म्हणाले होते, ‘‘मेहुलकडून ‘तत्परता’ हा गुण पुष्कळ शिकण्यासारखा आहे.’’

४. साधनेत साहाय्य करणे

अ. मेहुलदादा नेहमी मला सांगतो, ‘‘आपण आपल्या हातातील वेळ कधी घालवायचा नाही. प्रत्येक परिस्थिती देवच निर्माण करतो आणि तोच त्यातून आपल्याला पुढे नेत असतो; म्हणून आपण त्यातून शिकून पुढे जायचे असते.’’

आ. एकदा मी त्याला एक प्रसंग सांगितला. त्या वेळी तो मला म्हणाला, ‘‘ताई, तुम्ही असा का विचार केला ? तुम्ही अपेक्षा करू नका; कारण तुम्ही समोरच्या व्यक्तीत पालट करू शकत नाही; पण स्वतःमध्ये पालट करू शकता ना ?’’ तेव्हा ‘आपण कसे घडायचे ?’, हे मला शिकता आले.’

– देवाचे लेकरू,

कु. अमृता मुद्गल (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२१)