सतत सकारात्मक आणि शिकण्याच्या स्थितीत राहून मनापासून साधनेचे प्रयत्न करणार्‍या मुलुंड (मुंबई) येथील डॉ. (सौ.) सायली यादव !

डॉ. (सौ.) सायली यादव

‘विवाहानंतर साधनेत खंड पडला असतांनाही डॉ. (सौ.) सायली यादव यांच्यातील गुरूंप्रती श्रद्धा आणि साधकवृत्ती यांमुळे नकळतपणे त्या पुन्हा सनातनशी जोडल्या गेल्या. या कालावधीत ‘साधक ते वाचक’ आणि पुन्हा ‘वाचक ते साधक’ या त्यांच्या साधनाप्रवासात गुरुदेवांनी त्यांचे बोट धरून त्यांना पुन्हा साधनेत कसे आणले ?’, हे अनुभवायला मिळते. ‘गुरुदेवांनी एखाद्या साधकाचे बोट पकडले, तर त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी गुरुदेव सतत संधी देतात’, हे यातून दिसून येते. डॉ. (सौ.) सायली यादव यांनी या संधीचे सोने करून पुन्हा साधनेसाठी जोमाने प्रयत्न चालू केले. अशा प्रसंगांतून जाणार्‍या साधकांसह सर्वांसाठीच त्यांचे प्रयत्न अनुकरणीय आहेत.

१. सनातन संस्थेच्या ग्रंथाच्या माध्यमातून साधनेत येणे

१ अ. एका देवळाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनावर ग्रंथ विकत घेणे आणि काही दिवसांतच साधक घरी भेटीसाठी आल्यावर त्यांनी कुलदेवतेचा नामजप करायला सांगितल्यावर नामजपाला प्रारंभ करणे : ‘वर्ष २००१ मध्ये मी आणि माझी आई प्रथम सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. त्या वेळी आम्ही ठाणे येथे रहात होतो. आमच्या घराजवळ एका देवळात सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. मी आणि आई तेथे गेलो. आम्ही तेथे काही ग्रंथ पहिले. मी त्यातील एक ग्रंथ विकत घेतला. तेथील साधकांनी आमचा पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहून घेतला. काही दिवसांनी श्री. कोंडिबा जाधवकाका आम्हाला भेटण्यासाठी आले. त्यांनी आम्हाला कुलदेवतेचा नामजप करायला सांगितला. त्यानंतर आम्ही नामजपाला प्रारंभ केला.

१ आ. ‘श्री कुलदेवताय नम: ।’ हा नामजप चालू केल्यावर काही दिवसांतच कुलदेवतेचे नाव समजणे आणि सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर ही पहिली अनुभूती असणे : आम्ही नामजपाला प्रारंभ केला; मात्र कुलदेवता ठाऊक नसल्याने आम्ही ‘श्री कुलदेवताय नमः ।’ असा नामजप चालू केला. त्यानंतर काही दिवसांतच माझ्या एका काकांकडून आमची कुलदेवता तुळजापूर येथील श्री भवानीदेवी असल्याचे समजले. काही दिवसांनी आम्ही सहकुटुंब तुळजापूर येथे जाऊन देवीची ओटी भरली. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर आम्हाला आलेली ही पहिली अनुभूती होती.

१ इ. प्रारंभी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधील न समजणारे विषय साधना करू लागल्यावर समजायला लागणे : काही कालावधीनंतर माझी आई सत्संगाला जाऊ लागली. आम्ही साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू केले. मला मराठी भाषेचे बर्‍यापैकी ज्ञान असूनही साप्ताहिकातील चैतन्य आणि आध्यात्मिक त्रास यांमुळे मी ते अनेक वेळा वाचूनही मला त्यातील लिखाण समजायचे नाही. मी आईसमवेत हळूहळू सत्संगाला जायला प्रारंभ केला. त्यानंतर मला साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधील विषय समजू लागले. ‘ईश्‍वराचे चैतन्य अनुभवण्यासाठी बुद्धीचा नाही, तर साधनेचा उपयोग होतो’, हे त्या वेळी माझ्या लक्षात आले. नंतर मी लहान-सहान प्रासंगिक सेवांत सहभागी होऊ लागले.

२. विवाहानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून गुरुदेवांनी कायम सत्संग देणे

२ अ. साधनेपासून दुरावले असतांनाही गुरुपौर्णिमेला गुरुपूजनाची संधी देऊन गुरुदेवांनी कृपेची जाणीव करून देणे : वर्ष २००६ मध्ये विवाह झाल्यानंतर मी थोडीफार सेवा करत होते. मी सासरच्या घरी दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू केले. वर्ष २००९ मध्ये मुलाच्या जन्मानंतर माझे सेवेला जाणे जवळजवळ बंदच झाले; पण दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून गुरुदेव मला कायम सत्संग देत होते. माझी व्यष्टी आणि समष्टी साधना यांची घडी पूर्णतः विस्कळीत झाली होती. ‘साधक ते दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचक’ असा उलटा प्रवास मी या काळात अनुभवला; पण तरीही गुरुमाऊलीने माझा हात घट्ट धरला होता. या दिवसांतही मला गुरुमाऊलीचे विस्मरण कधीच झाले नाही. वर्ष २०११ मध्ये माझ्या दिरांच्या आकस्मिक निधनाचा आघात आमच्या कुटुंबावर झाला. अशा कठीण प्रसंगातही केवळ गुरुदेवांचा धावा करून मी नोकरी करत असतांनाही कुटुंब आणि लहान मुलगा यांना सांभाळू शकले. त्याच वर्षी ठाणे येथील गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला वाचक दांपत्य म्हणून आमची गुरुपूजनासाठी निवड झाली. ‘गुरुदेव सदैव माझ्या समवेत आहेत’, याचीच ही पोचपावती होती.

२ आ. दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे साधनेत टिकून रहाणे : दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून मिळणारी गुरुदेवांची शिकवण मला कायमच उपयोगी पडली. सासरी कुटुंबात वागतांना ‘कर्तव्यपूर्ती करणे, परिस्थिती स्वीकारणे, तडजोड करणे, नम्रतेने वागणे’, या गोष्टी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील साधकांच्या लेखांतून मला शिकायला मिळायच्या. नोकरीच्या ठिकाणी आणि समाजात वावरतांना गुरुदेवांचे विचार दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रूपात समवेत असल्याने मला प्रत्येक प्रसंगात स्थिर रहाता आले. ‘सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे, नम्रतेने वागणे, अन्यांचा विचार करणे, निरपेक्षपणे वागणे’, हे ईश्‍वरी गुण दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनातून मला आत्मसात होत होते. ‘आई-वडीलही शिकवू शकणार नाहीत’, अशा गोष्टी दैनिक ‘सनातन प्रभात’ने मला शिकवल्या. वर्ष २००९ ते २०१९ या १० वर्षांत मला दैनिक ‘सनातन प्रभातचा’ आधार वाटला.

२ इ. नियमित दैनिक ‘सनातन प्रभात’ च्या वाचनातून सत्संग मिळणे : माझ्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेख सत्संगच होते. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचले नाही, तर मला चुकल्यासारखे वाटायचे. एखाद्या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन झाले नाही, तर मी ते दुसर्‍या दिवशी प्रवास करतांना वाचायचे. त्यातून मला सत्संग मिळायला लागला.

३. गुरुदेवांच्या कृपेने पावणेतीन वर्षांत ‘डॉक्टरेट’ पदवी संपादन करणे

गुरुदेवांच्या कृपेने मी शिक्षणातील पुढील यश संपादन करत गेले. वर्ष २०१६ मध्ये ‘पी.एच्.डी.’साठी नोंदणी करून अवघ्या पावणे तीन वर्षांच्या विक्रमी न्यूनतम कालावधीत मी ती पूर्ण करू शकले. मला केवळ गुरुदेवांच्याच कृपेने शिक्षणक्षेत्रातील सर्वोच्च पदवी मिळाली.

४. संतांच्या १० मिनिटांच्या सत्संगातून जीवनाला कलाटणी मिळणे

मी माहेरी आल्यावर माझे आईशी (सौ. दक्षता जाधव यांच्याशी) साधनेविषयी बोलणे व्हायचे. आई मला सातत्याने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी सांगायची; पण वेळ नसल्याचे कारण देऊन मी विषय टाळायचे. नंतर मी मुंबई येथील सेवाकेंद्रात जाऊ लागले. एकदा सेवाकेंद्रात माझी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्याशी भेट झाली. मी गुरुदेवांना कधीच प्रत्यक्ष पाहिले नाही. माझे त्या दोघींशी १० मिनिटे बोलणे झाले. मला त्यांच्या बोलण्याने जणू झपाटून टाकले. त्या सत्संगानंतर ‘माझा जन्म कशासाठी झाला आहे ?’, असा विचार माझ्या मनात येऊ लागला आणि मी हळूहळू प्रासंगिक सेवांसाठी जाऊ लागले. हळूहळू मी ‘सोशल मिडिया’ (‘आपत्कालाच्या दृष्टीने कोणती सिद्धता करावी ?’, ‘साधना कोणती करावी ?’ तसेच ‘ऑनलाईन सत्संग’ यांविषयीच्या पोस्ट्स आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पी.डी.एफ्. पाठवणे) आणि टंकलेखन या माध्यमातून सेवा करू लागले.

५. दळणवळण बंदीच्या काळात साधनेच्या प्रयत्नांत वाढ होणे

दळणवळण बंदीच्या काळात देवाने मला पुष्कळ वेळ उपलब्ध करून दिला. मी भ्रमणभाषच्या माध्यमातून ‘भगवंत भेट’ सत्संग ऐकू लागले. त्यातील साधकांचे प्रयत्न ऐकून मीही तसे प्रयत्न करू लागले. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया प्रामाणिकपणे अन् सातत्याने राबवू लागले. गुरुकृपेने मला या प्रक्रियेतील आनंद अनुभवता आला आणि आजही मी आनंद अनुभवत आहे. देवाने मला ज्या समष्टी सेवा उपलब्ध करून दिल्या, त्या मी तत्परतेने स्वीकारल्या. मी ‘कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हणायचे नाही’, असे ठरवले. गुरुपौर्णिमेची सेवा करत असतांनाही मी आनंद अनुभवत आहे. मला प्रत्येक संपर्कातून गुरुदेव काहीना काही शिकवत आहेत. अशा प्रकारे मी विवाहानंतर साधनेपासून दुरावल्यानंतर पुनश्‍च ‘वाचक ते साधक’ असा प्रवास आज अनुभवत आहे. ‘आता मात्र मागे वळून पहायचे नाही’, असे मी ठरवले आहे.

‘गुरुदेवा, तुम्हीच माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी सेवा आणि साधना करवून घ्यावी’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. कृतज्ञता !’

– डॉ. (सौ.) सायली सुशील यादव, मुंबई (जुलै २०२०)

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मार्गदर्शनाने स्वतःत गुणवृद्धी करून तळमळीने सेवा करणार्‍या डॉ. (सौ.) सायली यादव !

पू. (सौ.) संगीता जाधव

१. दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील मार्गदर्शनाने स्वतःत कौशल्य विकसित करणे आणि नोकरीमध्ये त्यांचा उपयोग करणे

‘सौ. सायलीताईंनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन करून त्याचा बारकाईने अभ्यास केला आहे. त्यातील मार्गदर्शनाचा उपयोग करून त्यांनी स्वतःत गुणवृद्धी करण्याचा प्रयत्न केला. ‘या कौशल्याचा उपयोग त्यांनी नोकरीत केला’, हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कृती वेळच्या वेळी करणे, सेवा परिपूर्ण करणे, विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिकवणे, नोकरीत कर्तव्याचे पालन करणे आदी गुण त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील मार्गदर्शनातून स्वतःत विकसित केले. ‘व्यावहारिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवन कसे जगावे ?’, हे त्या दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून शिकल्या.

२. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील मार्गदर्शनामुळेच शिक्षक म्हणून निरपेक्षतेने आणि प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडता येत असल्याचे डॉ. (सौ.) सायली यादव यांनी सांगणे

सौ. सायलीताईंनी काही वर्षांपूर्वी शिक्षण पूर्ण केलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या नावांची सूची सिद्ध केली. हे विद्यार्थी आता विविध क्षेत्रांत नोकरी करत आहेत. विद्यार्थी असतांना चांगले गुण मिळाल्यावर आणि पुढील शिक्षणात यश प्राप्त झाल्यावर किंवा चांगली नोकरी मिळाल्यावर ते सायलीताईंना भेटवस्तू देण्यासाठी इच्छुक असत; मात्र ‘विद्यार्थ्यांना शिकवणे हे माझे कर्तव्यच आहे’, या भावनेतून त्या भेट स्वीकारत नव्हत्या. त्यांना ही शिकवण ‘सनातन प्रभात’मुळे मिळाली. त्यामुळेच ‘मला शिक्षक म्हणून निरपेक्षतेने आणि प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडता येत आहे’, असे त्या मानतात.

३. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ध्येय घेऊन नियोजनबद्ध आणि अष्टांग साधनेची जोड देऊन सेवा परिपूर्ण करणे अन् डॉ. (सौ.) सायली यादव यांनी केलेली सेवा सर्वांसाठी मार्गदर्शक असणे

सौ. सायलीताई यापूर्वी नामजप आणि सेवा करत होत्या. या गुरुपौर्णिमेच्या कालावधीत त्यांनी अध्यात्माचा प्रसार अतिशय चांगल्या प्रकारे केला. त्यामुळे त्यांच्यावर गुरुकृपेचा वर्षाव झाला. त्यांनी साधना योग्य प्रकारे समजून घेतली. त्यांनी गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ध्येय घेऊन नियोजनबद्ध आणि अतिशय उत्कृष्टरित्या प्रयत्न केले. त्यांनी ग्रंथवितरण, अर्पण गोळा करणे, विज्ञापने मिळवणे, यांसाठी ध्येय ठेवून ते समयमर्यादेत पूर्ण केले. त्यांनी सेवेला अष्टांग साधनेची जोड देऊन परिपूर्ण सेवा करण्याचा ध्यास घेतला. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत त्यांनी केलेली प्रत्येक सेवा ही सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.

४. ‘स्वतःशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला साधना सांगण्यासाठीच भगवंताने जोडले आहे’, असा भाव ठेवून सर्वांना साधना सांगणे

सायलीताईंमध्ये सेवेची तळमळ आणि कृतज्ञताभाव असून प्रत्येक जिज्ञासूपर्यंत सहजतेने अन् सोप्या पद्धतीने साधना पोचवण्याचा त्यांचा प्रयत्न उत्कृष्ट आहे. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत त्यांनी प्रत्येक सेवा भावमय होऊन केली. ‘मित्र-मैत्रिणी, नातेवाइक, विद्यार्थी, शिक्षक, सहकारी आदी जे कुणी माझ्या संपर्कात आहेत, त्यांना देवाने माझ्याशी साधना सांगण्यासाठी जोडले आहे. मला केवळ त्यांच्यापर्यंत साधना पोचवायची आहे’, हे त्यांना मनोमन पटले आहे. त्याप्रमाणे भाव ठेवून त्या सर्वांना साधना सांगत होत्या.

५. विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय यांना भ्रमणभाष करून साधना सांगणे

५ अ. ‘विद्यार्थ्यांना आपत्काळाला सामोरे जाता येण्यासाठी आणि खर्‍या अर्थाने विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल’, असा भाव ठेवून त्यांना साधना सांगणे : या गुरुपौर्णिमेच्या कालावधीत त्यांनी विचार केला, ‘मी विद्यार्थ्यांना शिकवले; मात्र त्यांना खर्‍या अर्थाने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी अन् पुढील आपत्काळाला सामोरे जाता येण्यासाठी आणि त्यांना जीवनात खर्‍या अर्थाने आनंदी करायचे असेल, तर त्यांना साधना सांगायला हवी.’ त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना संपर्क करण्याचे ठरवले. सायलीताईंनी विद्यार्थ्यांचे भ्रमणभाष क्रमांक शोधून त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनी विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय यांना साधनेचे महत्त्व सांगितले. सायलीताईंनी विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यानुसार त्यांना नामजप, साधना आणि अर्पण यांचे महत्त्व सांगितले. सायलीताईंनी त्यांना ‘कुटुंबातील सर्वांना कशा प्रकारे साधना करता येईल ?’, हेही समजावून सांगितले.

५ आ. ‘एका भेटीतच साधनेची रूची निर्माण होईल’, अशा कौशल्याने सर्वांना साधना सांगणे : सायलीताईंनी विद्यार्थ्यांना भ्रमणभाष केल्याने विद्यार्थ्यांना आनंद झाला. ‘ज्या शिक्षकांनी आपणाकडून कधी भेटवस्तू स्वीकारली नाही, त्या गुरुपौर्णिमेनिमित्त अर्पण मागत आहेत आणि साधना सांगत आहेत, म्हणजे यामध्ये काहीतरी विशेष आहे’, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. सायलीताईंनी सांगितलेला विषय विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी चांगल्या प्रकारे समजून घेतला. सायलीताई विषय इतक्या चांगल्या प्रकारे सांगतात की, त्यामुळे त्यांच्या एका भेटीतच जिज्ञासूंमध्ये साधनेविषयी रूची निर्माण होते.

६. ‘सनातन प्रभात’चे वाचक हेे साधकच आहेत’, असे परात्पर गुरुदेवांनी सांगणे आणि डॉ. (सौ.) सायली यादव यांना पाहून त्याची प्रचीती येणे

परात्पर गुरुदेवांनी पुष्कळ वेळा म्हटले आहे, ‘‘सनातन प्रभात’ चे वाचक हे साधकच आहेत. त्यांची भेट घ्यायला हवी. त्यांच्या संपर्कात रहायला हवे.’’ सौ. सायलीताईला पाहून परात्पर गुरुदेवांच्या वचनांची प्रचीती आली. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे सौ. सायलीताई यांच्यासारख्या साधिका घडल्या’, त्याविषयी गुरुमाऊली आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, तितकी अल्पच आहे.’

– (पू.) सौ. संगीता जाधव, मुंबई सेवाकेंद्र (जुलै २०२०)

अधिकाधिक लोकांपर्यंत गुरुकार्य पोचवण्यासाठी तळमळीने सेवा करणार्‍या मुलुंड (मुंबई) येथील डॉ. (सौ.) सायली यादव !

१. सौ. कल्पना कार्येकर, वडाळा, मुंबई

१ अ. ‘सेवा करायला पाहिजे’, असा विचार मनात येणे आणि त्यानुसार डॉ. (सौ.) सायली यादव यांनी संगणकीय सेवा करण्यास प्रारंभ करणे : डॉ. (सौ.) सायली यादव या पी.एच.डी. झालेल्या असून महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या प्राध्यापक म्हणून नोकरी करत असतांना त्यांना सेवेसाठी अल्प वेळ मिळत असे. ‘अन्य साधक सेवा करतात, तसेच मलाही सेवा करायला पाहिजे’, असा विचार त्यांच्या मनात असायचा. ‘मला संगणकीय सेवा देऊ शकता’, असे त्या सांगत असत. त्याप्रमाणे त्यांनी संगणकीय सेवा करण्यास प्रारंभ केला.

१ आ. महाविद्यालयातील मोकळ्या वेळेत टॅक्सीने सेवाकेंद्रात येणे आणि तेथे अर्धा ते पाऊण घंटा मिळेल ती सेवा करून पुन्हा टॅक्सीने महाविद्यालयात जाणे, त्या प्राध्यापक असूनही त्यांची सेवेसंदर्भात कुठेही आवड-निवड अन् अहं नसल्याचे लक्षात येणे : त्या महाविद्यालयात असतांना त्यांना सकाळी नऊच्या सुमारास एखादा घंटा मोकळा मिळायचा. ‘मला एका घंट्यासाठी सेवाकेंद्रात सेवा मिळू शकते का ?’, असे त्यांनी विचारले. त्याप्रमाणे आठवड्यातून एकदा तरी त्या टॅक्सीने सेवाकेंद्रात येऊन अर्धा ते पाऊण घंटा सेवा करून परत टॅक्सीने महाविद्यालयात जायच्या. यातून त्यांची सेवेची तळमळ दिसून येते. ‘त्या प्राध्यापक असल्याने त्यांना एका घंट्यासाठी काय सेवा द्यायची’, असे मला वाटायचे; पण त्यांनी सांगितले, ‘‘मला तुम्ही स्वयंपाकघरात सेवा दिली, तरी चालेल. मला धान्य निवडायला दिले, तरी चालेल. मला कोणतीही सेवा द्या.’’ ‘त्या प्राध्यापक असूनही त्यांची सेवेसंदर्भात कुठेही आवड-निवड किंवा अहं नव्हता’, असे माझ्या लक्षात आले.

१ इ. अधिकाधिक लोकांपर्यंत गुरुकार्य पोचण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवणे आणि देवही त्यांना नवीन संकल्पना सुचवत असल्याचे लक्षात येणे : अधिकाधिक लोकांपर्यंत गुरुकार्य पोचण्यासाठी त्या वेगवेगळ्या संकल्पना राबवायच्या. ‘आता काय करू ? आता कसे करू ?’, असे त्या देवाला प्रार्थना करून विचारायच्या. ‘देवही त्यांना नवीन नवीन संकल्पना सुचवत होता’, असे माझ्या लक्षात आले.

२. सौ. सुजाता शेट्ये, मुंबई

२ अ. दळणवळण बंदीच्या काळात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने झोकून देऊन सेवा करणे आणि साधकांना सहजतेने ‘व्हॉटस्अ‍ॅप’ आणि ‘फेसबूक’ यांच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करायला शिकवणे अन् त्यामुळे साधक अधिकाधिक ‘ऑनलाईन’ संपर्कसेवा करू शकणे : दळणवळण बंदीच्या काळात सौ. सायलीताई अधिकाधिक झोकून देऊन सेवा करू लागल्या. ‘मनापासून सेवा करणे, सेवा परिपूर्ण करणे आणि ‘इतरांचा विचार करणे’ हे गुण मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेे. त्या ‘भगवंत भेट’ सत्संगात त्यांच्या अनुभूती सांगायच्या. ते ऐकून माझी भावजागृती व्हायची. त्यांच्यात ‘ऐकण्याची आणि शिकण्याची वृत्ती’, हे गुण आहेत. ‘साधकांचे सोशल मिडियातील प्रयत्न कसे असायला हवे ?’, त्यासाठी लागणारे ‘व्हॉटस्अ‍ॅप’, ‘फेसबूक’ ‘वॉच पार्टी’ हे त्यांनी साधकांना संगणकीय प्रणालीद्वारे शिकवले. त्यामुळे साधक अधिकाधिक ‘ऑनलाईन’ संपर्क सेवा करू शकले.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक