नांदेडमधील हिंसाचार !

नांदेड जिल्हा जरी हिंदूबहुल महाराष्ट्रात असला, तरी त्याची ओळख शिखांच्या नावानेच आहे. नांदेडला शिखांची ‘दक्षिण काशी’ म्हणून जागतिक पातळीवर ओळखले जाते. जगभरातील शीख बांधव येथील गुरुद्वारात एकदा तरी येतातच. गुरु गोविंद सिंह यांचे वर्ष १७०८ मध्ये येथेच देहावसान झाल्याने शिखांच्या धार्मिक भावना येथील भूमीशी जोडल्या गेल्या आहेत; मात्र याच शीख समाजातील काही समाजकंटकांनी त्यांच्या दक्षिण काशीला गालबोट लावले. तेही धूलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी ! धुळवडीला खरेतर एकमेकांना रंग लावून तो उत्सव आनंदाने-उत्साहाने साजरा केला जातो; मात्र याच दिवशी शिखांमधील काही समाजकंटकांनी होळीच्या रंगात नव्हे, तर रक्ताच्या लाल रंगात नांदेडच्या मातीला भिजवले !

शिखांचा हैदोस !

नांदेडमधील हिंसाचार

प्रत्येक वर्षी धूलिवंदनाच्या दिवशी शिखांच्या वतीने येथील सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारात मोहल्ला हल्लाबोल हा कार्यक्रम घेण्यात येतो. गेल्या ३०० वर्षांपासूनची असलेली ही धार्मिक परंपरा शीख जोपासत आहेत. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नांदेडमध्ये ४ एप्रिलपर्यंत दळणवळण बंदी घोषित केली. त्यामुळे या कार्यक्रमावरही निर्बंध घालणे साहजिकच आणि अत्यावश्यक होते. कार्यक्रमात केवळ धार्मिक विधी होणार होते आणि पूजा-अर्चा करण्यात येणार होती. मिरवणुकीवर बंदी होती; मात्र कार्यक्रमाचे हे स्वरूप सहन न झाल्याने आणि पोलिसांनी कार्यक्रमावर निर्बंध आणल्याने समाजकंटक चवताळले. पोलीस आणि प्रशासन यांच्या आदेशांची पायमल्ली करत शीख समाजातील लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले. त्यांनी मिरवणूक काढली आणि पोलीस अधिकार्‍यांच्या गाड्यांवरही पुष्कळ दगडफेक करून त्यांची नासधूस केली. वाहनांच्या टायरमधील हवा सोडली. बॅरिकेट्स तोडले. काचा फोडल्या. काही शीख समाजकंटकांनी त्यांच्या तलवारी उपसल्या, त्या थेट कायद्याचे रक्षक असणार्‍या पोलिसांवरच ! या संपूर्ण भीषण प्रकारात १४ पोलीस घायाळ झाले. हातातील हत्यारांच्या साहाय्याने पोलीस ठाण्याच्या भिंतींवरही आक्रमण करण्याचा ते सर्वजण प्रयत्न करत होते. तेथे धार्मिक विधी करणार्‍यांसमवेतही या समाजकंटकांनी चुकीचे वर्तन केले. बंद प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून मोठा समुदाय हातात तलवारी घेऊन मुख्य रस्त्यावर आला. एका पोलिसावर आक्रमण होत असतांना त्यांचा अंगरक्षक मधे आल्याने एका समाजकंटक शिखाने तलवार थेट त्याच्या पोटात घुसवली, ती अगदी पाठीपर्यंत…त्या जखमेतून अंगरक्षकाचे आतडेही दिसत होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. इतका भयानक प्रकार, नव्हे अनर्थच तेथे घडला. सर्व काही पोलिसांच्या जिवावरच बेतले. खरेतर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तेथे तैनात होता; मात्र पोलिसांनाच शीख समाजकंटकांपुढे लाचार होत त्यांच्या आक्रमणाला बळी पडावे लागले. पोलिसांच्या बंदुका आणि दंडुके यांचा तर काहीच उपयोग झाला नाही. ना मारण्यासाठी, ना दहशतीसाठी ! संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांनी ४०० जणांवर गुन्हा नोंद केला आहे.

कोरोनामुळे पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून निर्गमित केल्या जाणार्‍या आदेशांचे पालन करायला हवे; पण शीख समाजातील या समाजकंटकांचे वरील कृत्य पहाता, त्यांना सामाजिक बांधीलकीविषयी कसलेही देणेघेणे नाही, समाजहिताचा विचारच नाही, तसेच सामाजिक कर्तव्यांची थोडीशीही जाणीव नाही, हे खेदजनक आहे. गुरुद्वाराच्या एका कर्मचार्‍याने याविषयी सांगितले, ‘‘आमचे काही तरुण भावनेच्या भरात वहात गेले. मिरवणुकीला अनुमती नाकारल्याने हा गदारोळ झाला. आता परिस्थिती निवळली आहे.’’ पण प्रत्यक्षात परिस्थिती कुठे निवळली आहे ? रस्त्यावरील धुडगूस थांबला, तलवारी आपापल्या म्यानात गेल्या; पण ज्या तलवारींनी नांदेडच्या भूमीवर हिंसाचार करण्यात आला, ज्या आक्रमणामुळे पोलीस गंभीररित्या घायाळ झाले, ज्यांच्या जखमा खोलवर गेल्या आहेत, ही परिस्थिती कधीतरी निवळू शकेल का ? याचे उत्तर शीख धर्मियांनी द्यावे.

कट्टरतावादाची शिकार !

खरे पहाता दहशत ही पोलिसांचीच हवी, कायदा-सुव्यवस्थेचा धाकही पोलिसांनीच निर्माण करायला हवा. असे जरी असले, तरी नांदेडमधील या घटनेमुळे सर्वच समीकरणे पालटून गेली आहेत. ‘पोलीस’ हा शब्द आज केवळ नावाला उरला आहे कि काय ?’, असेच सध्याच्या घटनांवरून वाटते. ‘पोलीस’ हा शब्द उच्चारताच वाटणारा दरारा, धाक, एकप्रकारची भीती, दहशत हे सर्व संपून गेले आहे. पोलिसांना कसेही वागवा, त्यांच्यावर आरोप करा, त्यांना लाथाबुक्क्यांनी तुडवा, त्यांच्यावर शस्त्र उगारा, मग ती बंदूक असो किंवा तलवार ! अशा स्थितीत असणारे पोलीस आज जीव मुठीत धरूनच आपले कर्तव्य पार पाडत आहेत. पोलिसांनी या स्थितीकडे दुर्लक्ष न करता समाजाच्या मनात ‘पोलीस’ म्हणून असलेला आदर पुन्हा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पोलीसच जर आक्रमणाचे बळी ठरू लागले, तर जनतेने रक्षणासाठी कुणाचा आसरा घ्यायचा ? धर्मांध तर पोलिसांच्या उरावरच बसलेले असतात. त्यांच्या तावडीतून पोलिसांची सुटकाच नसते. आता शीख समाजातील काही समाजकंटकांनी पोलिसांना लाचार करण्याच्या प्रक्रियेत उडी घेतली आहे. एकूणच काय तर धर्मांध असो किंवा एखाद्या समाजातील काही समाजकंटक असो, पोलिसांना त्यांच्या कट्टरतावादाची शिकार व्हावे लागत आहे, हेच खरे ! अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी आणि पोलीस विभाग सक्षम व्हावा, यासाठी पोलिसांनीच प्रयत्न करणे क्रमप्राप्त आहे.

पगडी आणि कृपाण ही शिखांची ओळख आहे. ती स्वरक्षणासाठी आहे. शीख पंथ हा क्षात्रवृत्तीचा प्रतीक आहे. स्वतःकडील शस्त्र कुणावर उगारावे, याविषयी शिखांमध्येही काही नियम आहेत. आज शिखांमधील समाजकंटक त्यांची धार्मिक ओळख असलेल्या शस्त्राचा असा दुरुपयोग करत असतील, तर ही चिंतेची गोष्ट आहे. आज बरेच शीख तरुण खलिस्तानवादी शिकवणीला बळी पडत आहेत. या समाजात कट्टरतावाद बळावत आहे. एकेकाळी धर्मरक्षणार्थ आणि राष्ट्रहितार्थ बलीदान देणार्‍या या समाजातील एक घटक अशा प्रकारे भरकटत असतांना या समाजाला दिशादर्शन करण्याचे मोठे दायित्व शिखांच्या धर्मगुरूंवर आहे. नांदेडमधील हिंसाचारातून हेच सूत्र अधोरेखित होते !