सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना पुन्हा अटक

वीजजोडणी तोडल्याचा जाब विचारत महावितरणच्या कर्मचार्‍याला मारहाण केल्याचे प्रकरण

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे

सोलापूर – येथील उपमहापौर राजेश काळे यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. ‘मित्राच्या घराची वीजजोडणी का कापली ?’, याचा जाब विचारत काळे यांनी महावितरणच्या कर्मचार्‍याला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राजेश काळे यांच्यासह अन्य दोघांनाही पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या सर्व आरोपींना न्यायालयासमोर उपस्थित केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (असे गुंड प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्‍न काय सोडवणार ? – संपादक)

१. येथील शिवण्णा म्हेत्रे यांचे वीजदेयक थकीत होते. त्यामुळे त्यांचा विद्युत् पुरवठा खंडीत करण्यात आला होता; मात्र आरोपी राजेश काळे यांनी नेहरूनगर येथील महावितरणच्या कार्यालयात कर्मचार्‍याला याविषयी जाब विचारला, तसेच आपण सोलापूरचे उपमहापौर आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा वीजजोडणी करून देण्याविषयी दबाव टाकला. तक्रारदार अजीम सय्यद यांनी याविषयी तक्रार केली आहे. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राजेश काळे यांच्यासह ६ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

२. ३० डिसेंबर २०२० या दिवशी उपमहापौर राजेश काळे यांच्यावर पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना दूरभाष करून अश्‍लील शिवीगाळ, तसेच खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता; मात्र गुन्हा नोंद होताच काळे ५ ते ६ दिवस पसार झाले होते.