भारतासाठी चीन एक आव्हानात्मक शेजारी देश ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

भारताने हे आव्हान स्वीकारून चीनवर मात केली पाहिजे. त्या दिशेने भारताचे प्रयत्न असले पाहिजेत !

नवी देहली – भारतासाठी चीन एक आव्हानात्मक शेजारी देश आहे, असे विधान परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी एका कार्यक्रमात केले.

जयशंकर पुढे म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेत चीन वेगाने पुढे जाणारा देश आहे. यावर कुठलेही दुमत नाही. यासाठी गेल्या ४० वर्षांत त्याने केलेल्या कामाचे कौतुक केले पाहिजे. चीनने पुढे जाण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले. पश्‍चिमेतील देशांच्या विचाराच्या विरोधात जाऊन चीनने स्वतःचा विकास केला. भविष्यात जागतिक स्थिती कशी असेल, याचा अंदाज आता लावणे कठीण आहे. भारताला आपल्या क्षमता विकसित करून स्पर्धात्मक वृत्ती वाढवली पाहिजे. हे माझे राजकीय विचार नाहीत, तर मी केलेल्या आकलनावरील हे माझे वैयक्तिक विचार आहेत, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

भारताला पाकिस्तानसमवेत एका सामान्य शेजार्‍यासारखे संबंध हवे आहेत !

जयशंकर पाकविषयी म्हणाले की, भारताला पाकिस्तानसमवेत एका सामान्य शेजार्‍यासारखे संबंध हवे आहेत. प्रत्येकाला याचा अर्थ ठाऊक आहे. आपण त्या दिशेने पुढे गेलो, तर स्वागतार्ह आहे. अलीकडेच पाकिस्तान आणि भारताच्या ‘मिलिटरी ऑपरेशन’च्या महासंचालकांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन न करण्याचा एका महत्त्वाचा करार झाला आहे. हा करार नियंत्रणरेषेवरील गोळीबार रोखण्यासाठी झाला आहे. (पाकची मानसिकता पहाता तो कधीही भारताचा चांगला शेजारी होऊ शकत नाही. पाकला नष्ट केल्यावरच भारताला शांतता लाभू शकते, हे प्रत्येक भारतीय शासनकर्त्याने लक्षात ठेवायला हवे ! – संपादक)

अफगाणिस्तानमध्ये सार्वभौम लोकशाही व्यवस्था हवी

अफगाणिस्तानविषयी जयशंकर म्हणाले की, भारताला अफगाणिस्तानमध्ये सार्वभौम लोकशाहीव्यवस्था हवी आहे. हे तिथे रहाणार्‍या अल्पसंख्य समाजाच्या हिताचे असेल. भारत अफगाणिस्तानमध्ये शांतता स्थापित होऊन तेथे लोकांचे पुनर्वसन व्हावे, या मताचा आहे. यामुळे तालिबानकडून आपल्याला अपेक्षा आहेत. सध्या आपण ‘थांबा आणि पहा’च्या स्थितीत आहोत.