३१ मार्चला शिवजयंतीदिनी कळंगुटपर्यंत मिरवणूक नेणारच ! – शिवप्रेमींचा निर्धार

शासनाकडून अनुमती नाही

म्हापसा, २६ मार्च (वार्ता.) – तिथीनुसार शिवजयंतीदिनी म्हणजेच ३१ मार्च या दिवशी म्हापसा ते कळंगुट आणि परत म्हापसा, अशी मिरवणूक काढण्यावर शिवप्रेमींच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे. मिरवणुकीसाठी शासनाची अनुमती मिळाली नसली, तरी मिरवणूक काढणारच, असे शिवप्रेमींनी ठरवले आहे.

शिवप्रेमींना दिनांकानुसार शिवजयंतीदिनी म्हणजे १९ फेब्रुवारी या दिवशी कळंगुट येथे मिरवणूक काढण्यास पोलिसांनी रोखले होते. यानंतर गोव्यातील शिवप्रेमींनी म्हापसा येथील हुतात्मा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा घेऊन ३१ मार्च या दिवशी कळंगुट येथे मिरवणूक काढण्याचे घोषित केले होते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती आणि गोमंतकातील शिवप्रेमी संघटनेचे प्रतिनिधी यांच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत ३१ मार्च या दिवशी कळंगुट येथे मिरवणुकीसाठी शासनाची अनुज्ञप्ती मिळाली नसली, तरी मिरवणूक काढण्याचे ठरले आहे.

ही मिरवणूक यशस्वी होण्यासाठी गोवाभरातील शिवप्रेमींच्या संघटनेचे प्रमुख विश्‍वेश प्रभु जनसंपर्क करत आहेत. ३१ मार्चच्या मिरवणुकीसाठी १९ मार्च या दिवशी अर्ज देऊनही अद्याप शासकीय अनुज्ञप्ती मिळालेली नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. ३१ मार्च या दिवशी होणार्‍या मिरवणुकीचा प्रारंभ म्हापसा येथील हुतात्मा चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पूतळ्याच्या परिसरात होणार आहे. त्यानंतर ही मिरवणूक साळगावमार्गे कळंगुटपर्यंत जाणार आहे. तेथील श्री शांतादुर्गादेवीचे आशीर्वाद घेऊन शिवछत्रपतींचा जयघोष करण्यात येणार आहे आणि नंतर हडफडेमार्गे म्हापसा येथे परत येऊन श्री बोडगेश्‍वर मंदिराच्या परिसरात मिरवणुकीची सांगता होणार आहे. या मिरवणुकीत गोव्यातील सर्व तालुक्यांतील शिवप्रेमी सहभागी होण्यासाठी प्रयत्न चालू आहे.

कळंगुट येथे मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यावरून असलेला वाद

कळंगुट येथे मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा विचार शिवप्रेमींकडून व्यक्त झाला. यानंतर १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी (दिनांकानुसार) शिवप्रेमींनी कळंगुट येथे शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन केले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित करून उपजिल्हाधिकार्‍यांनी या मिरवणुकीला अनुज्ञप्ती नाकारली होती. कळंगुट येथे सध्या भाऊसाहेब बांदोडकर आणि जॅक सिकेरा यांचे पुतळे आहेत. मंत्री मायकल लोबो यांनी कळंगुट येथील प्रमुख चौकात अर्जेटिनाचा जगविख्यात फुटबॉलपटू माराडोना यांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. कळंगुट येथे मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या अनुषंगाने मंत्री मायकल लोबो यांनी त्यांची भूमिका घोषित करावी, अशी मागणी कळंगुट येथे झालेल्या शिवप्रेमींच्या बैठकीत करण्यात आली.