‘ऐतिहासिक’ पालट आणि हिंदुद्वेषींचा थयथयाट !

विश्‍वविद्यालय अनुदान आयोगाने (‘यूजीसी’ने) बनवलेल्या कला शाखेच्या (बी.ए.) नवीन अभ्यासक्रमात इतिहासाच्या पुस्तकात काही ‘ऐतिहासिक’ पालट करण्यात आले आहेत. हा हिंदूंचा देश असतांना आणि येथे शेकडो पराक्रमी हिंदु राजवटी होऊन गेल्या असतांना आतापर्यंत इस्लामी आक्रमकांचा इतिहास पाठ्यक्रमात अतिशय विस्तृतपणे शिकवला गेला आणि हिंदु शासनकर्त्यांची अक्षरशः बोळवण करण्यात आली. त्यामुळे साहजिकच हिंदूंचे खच्चीकरण झाले, त्यांचा अवमान झाला आणि त्यांच्यात न्यूनगंड निर्माण झाला. आता हिंदूंचा सत्य इतिहास स्वातंत्र्यानंतर प्रथमच काही प्रमाणात शिकवला जाणार आहे आणि त्यामुळे हा पालट खरोखरच अतिशय अभिनंदनीय, हिंदूंचा स्वाभिमान परत आणणारा अन् म्हणूनच ‘ऐतिहासिक’ असा आहे ! त्यामुळेच या नवीन पाठ्यक्रमावर एम्.आय.एम्.चे नेते असदुद्दीन ओवैसी आणि काही साम्यवादी प्राध्यापक यांनी आक्षेप घेतला आहे. नवीन अभ्यासक्रमात मोगल राजसत्तेचे वर्चस्व दाखवणारे वर्णन अल्प करून प्राचीन भारतीय नागरिकांचे जीवन, त्यांची धर्मपद्धती, समाजव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था आदींचे वर्णन दिले आहे. त्यामुळे ओवैसी आणि तथाकथित बुद्धीवादी प्राध्यापक अन् विचारवंत यांचा थयथयाट झाला आहे. थोडक्यात सत्य इतिहास मांडल्यामुळे हिंदुद्वेषींच्या पोटात दुखू लागले आहे. ‘दी आईडिया ऑफ भारत’ असे कला शाखेच्या इतिहासाच्या पहिल्या पेपरचे नाव आहे. आर्.एस्. शर्मा आणि इरफान हबीब या लेखकांना पालटून सरकारने नवीन लेखकांची नियुक्ती केली आहे. हेही साम्यवाद्यांच्या पोटदुखीचे एक कारण आहे. हिंदूंचा सत्य इतिहास समोर येणे म्हणजे हिंदूंचा स्वाभिमान जागृत होणे आहे आणि त्यामुळेच हिंदुद्वेष्ट्यांच्या खरेतर पोटात भीतीचा गोळा आला आहे !

हिंदुद्वेष्ट्यांचे निधर्मी आणि ढोंगी आक्षेप !

या अभ्यासक्रमात सध्या लुप्त झालेल्या; परंतु अतीप्राचीन काळी अस्तित्वात असणार्‍या सरस्वती नदीचाही उल्लेख आहे; जो वेदांमध्येही आहे. बुद्धीवाद्यांनी याला आक्षेप घेतला आहे. सरस्वती नदीच्या अस्तित्वाचे पुरावे पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांनाही मिळाले आहेत आणि त्यांनी ते जगासमोर मांडले आहेत. बुद्धीवाद्यांच्या म्हणण्यानुसार या अभ्यासक्रमामुळे बाबासाहेब आंबेडकर, नेहरू आणि गांधी यांचे महत्त्व न्यून होत आहे. काही पौराणिक संदर्भ या पाठ्यक्रमात आहेत. पाश्‍चात्त्य विचारधारेनुसार बुद्धीवादी त्याला ‘मायथॉलॉजी’ (म्हणजे असे कथानक की, जे खोटे आहे) म्हणतात. पाश्‍चात्त्यांची झापडे लावलेल्या दृष्टीने त्या ‘मिथ्स’ (कहाण्या) ‘मिथ्या’ (म्हणजे खोट्या) असल्या, तरी भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने त्यात चमत्कार किंवा खोटेपणा नसून तो त्यांच्या प्रगत संस्कृतीचा अभिमान वाटावा असा भाग आहे. बुद्धीवाद्यांच्या मतानुसार या पाठ्यक्रमात हिंदु आणि मुसलमान यांचे १३ ते १८ व्या शतकात संबंध न दाखवल्यामुळे त्यांच्यात भेद होता, असे वाटत आहे. प्रत्यक्षात त्यांच्यात आताही भेद आहे आणि ते पराकोटीचे विरोधाभासी असून त्यांना एकत्र कसे असणार ? त्यामुळे हे निश्‍चितच आणखी एक आक्षेपार्ह सूत्र आहे. हिंदु संस्कृती प्राचीन काळापासून प्रगत आहे. ज्या काळात परकीय आक्रमकांच्या रानटी टोळ्या फिरत होत्या, त्या काळीही विशालकाय भारतभूवर प्रगत हिंदु संस्कृती होती. ‘तिथे मुसलमान आणि हिंदु एकत्रित गुण्यागोविंदाने रहात होते’, असे दाखवणे ढोंगी ‘निधर्मी’ बुद्धीवाद्यांना अपेक्षित आहे. त्याहूनही खरी मेख पुढे आहे. नवीन पाठ्यक्रमात तैमुर आणि बाबर आक्रमणकर्ते असल्याचे स्पष्टपणे म्हटलेले आहे. त्यामुळे ओवैसींसारख्यांना ते स्वीकारणे कठीण जात आहे. मुसलमानांचा इतिहास संपवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘हिंदुबहुल भारतात हिंदूंचा इतिहास योग्य पद्धतीने शिकवला गेला पाहिजे’, असे मात्र यांपैकी कुणाच्याच निधर्मीपणाच्या व्याख्येत बसत नाही. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे ‘आर्य बाहेरून आले आणि त्यांनी स्थानिकांवर आक्रमण करून राज्य केले (म्हणून उच्चवर्णियांचा द्वेष करा)’, हे इंग्रजांनी रचलेले कुभांड या पाठ्यक्रमात अप्रत्यक्षरित्या उघडे पाडले आहे. नवीन अभ्यासक्रमात वेद, उपनिषदे, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची संकल्पना आदी विषय हाताळले आहेत. त्यामुळे निधर्मी साहित्याऐवजी धार्मिक साहित्य शिकवले जात असल्याचा आरोप बुद्धीवाद्यांनी केला आहे. हिंदूंच्या भारतामध्ये त्यांच्या संस्कृतीचा इतिहास शिकवण्याची आज चोरी झाली आहे. गेली ६० वर्षे राज्य उपभोगलेल्या आणि धर्मांधांचे तळवे चाटण्यात पुरुषार्थ मानणार्‍या काँग्रेसची ही देण आहे.

सत्य इतिहास सांगण्यास चोरी कसली ?

त्यामुळे नेहमीप्रमाणे हे रा.स्व. संघाचे षड्यंत्र आणि ‘इतिहासाचे भगवेकरण’ करण्याचा आरोप हिंदुद्वेष्टे विरोधक करत आहेत. देहलीतील श्यामलाल महाविद्यालयाचे प्रा. मणि यांना धार्मिक साहित्याचा अभ्यासक्रमात गौरव झाल्याविषयी तीव्र आक्षेप आहे. यापूर्वी येथे मोगल आक्रमकांनाच येथील खरे राज्यकर्ते दाखवून हिंदूंच्या शौर्याचा इतिहास दडपण्यात आला, तेव्हा ‘तो खोटा इतिहास शिकवला जात आहे’, असे प्रा. मणि यांंना कधी वाटले नाही. पूर्वी भारतभरात विखुरलेली हिंदु आणि राजपूत राज्ये अन् त्यांचे राज्यकर्ते कित्येक पिढ्या मोगल आक्रमकांशी प्राणपणाने लढले अन् म्हणूनच दीड सहस्र वर्षे आक्रमकांनी आक्रमणे करूनही पूर्ण भारतावर त्यांना सत्ता कधीच मिळवता आली नाही. हा सत्य इतिहास आहे. भारतवर्षातील अशा शेकडो हिंदु राजांच्या मोगलांशी झालेल्या पराक्रमी लढाया हा हिंदूंच्या विजयाचा खरा इतिहास आहे; जो काँग्रेसी शासनानेच खरेतर मोठे षड्यंत्र करून आजपर्यंत लपवून ठेवला आहे. नेहरूंच्या काळापासून पहिले ६ शिक्षणमंत्री हे अल्पसंख्यांक होते. त्यामुळे केंद्रीय अभ्यासक्रमासह राज्यस्तरीय अभ्यासक्रमातही मोगली राजवटींचा उदो उदो झाला. हिंदूंच्या वास्तूंवर आक्रमण करून बांधलेल्या त्यांच्या वास्तूतील कलेची सर्वत्र वाहवा झाली. त्याचे प्रत्यक्ष मूळ हिंदूंच्या प्राचीन इतिहासात आहे; मग तो ३ सहस्र वर्षांपूर्वीचा न गंजणारा विष्णुस्तंभ असेल किंवा तेजोमहालय ! हे सत्य आता बाहेर आले, तर आपली नाचक्की होईल आणि हिंदूंची अस्मिता जागृत होईल, ही भीती ओवैसी अन् बुद्धीवादी यांच्या मनात आहे. यात भगवेकरण कसे आहे ? आणि असले तरी त्यात चूक काय आहे ? ७० वर्षे इस्लामीकरणाचा असत्य इतिहास संपूर्ण भारताने सहन केला. आता सत्य इतिहास हिंदूंना सांगण्याचे आणि त्यांनी ते समजून घेण्याचे दिवस काळानुसारच आले आहेत. त्यामुळे हिंदुद्वेष्ट्यांनी कितीही कोल्हेकुई केली, तरी सूर्याचे तेज झाकोळणार नाही आणि सत्य इतिहास बाहेर आल्यावाचून रहाणार नाही. हिंदुत्वनिष्ठांनीही निधर्म्यांच्या या ‘चोराच्या उलट्या बोंबां’ना बळी न पडता त्यांचे वैचारिक खंडन करून सरकारला पाठिंबा दिला पाहिजे !