प्रथमोपचार शिकून जीवदान द्या !

युद्धकाळ म्हणजे नागरिकांच्या राष्ट्राभिमानाच्या परीक्षेचा काळ ! या काळात स्वराष्ट्रासाठी योगदान देणे, हे प्रत्येक नागरिकाचे अलिखित राष्ट्रीय कर्तव्यच असते. युद्धजन्य परिस्थितीत तर सर्वाधिक हानी ही राष्ट्राची खरी संपत्ती असलेल्या मनुष्यबळाची अर्थात् नागरिक आणि सैनिक यांची होते. ही हानी रोखण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला युद्धसज्ज करण्यासाठी इंग्लंडने दुसर्‍या महायुद्धाच्या काळात देशातील नागरिकांच्या साहाय्याने ठिकठिकाणी प्रथमोपचाराची विशेष पथके उभारली होती. या पथकांनी घायाळ सैनिक आणि नागरिक यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना वाचवण्याचे, तसेच त्यांना पुनश्‍च युद्धसज्ज होण्यास सिद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले होते. आज जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे; म्हणूनच आगामी युद्धकाळात राष्ट्रहितार्थ योगदान देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने ‘प्रथमोपचारा’चे प्रशिक्षण घेऊन राष्ट्रकर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कधी भीषण स्वरूप धारण करतील, ती वेळ सांगून येत नाही. एखाद्या राज्यातील नैसर्गिक आपत्ती असो कि देशभरात दंगलींच्या माध्यमातून वारंवार उसळणारा हिंसाचार असो, अशा आपत्तींमध्ये मनुष्यहानी न्यूनतम व्हावी, यासाठी सदैव सिद्ध रहाणे, हे शासन आणि प्रशासन यांच्यासह नागरिकांचेही उत्तरदायित्व ठरते. महापूर अन् भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्ती, दंगली अन् अराजक यांसारख्या मानवनिर्मित आपत्ती आणि युद्धासारख्या राष्ट्रीय आपत्ती यांत मनुष्यहानी अधिक होते. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सामाजिक बंधुत्व, युद्धकाळात राष्ट्रबंधुत्व आणि दंगलीच्या काळात धर्मबंधुत्व प्रत्येकाला दाखवावे लागते. अशा प्रसंगी बहुसंख्य समाज प्रथमोपचार लागणे, भाजणे, बेशुद्ध पडणे आदी प्रसंगी रुग्णावर तात्पुरते उपचार करता यावेत, यासाठी कुटुंबातील एकाने तरी ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घ्यावे ! ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने ठिकठिकाणी विनामूल्य ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग’ घेतले जातात. या प्रशिक्षणवर्गांचा लाभ करून घ्यावा.

भीषण आपत्काळात विविध आपत्तींमध्ये कुणाला इजा किंवा दुखापत झाल्यास त्याच्यावर प्राथमिक उपचार कसे करावेत, रुग्णांना कसे हाताळावे याचे सर्वांनीच प्रशिक्षण घ्यावे !