आपत्काळात खरेदी करण्यासाठी प्रचंड दाटी (गर्दी) झाल्याने सर्व अन्नधान्य काही वेळेतच संपून जाते. शासनाकडून अन्नधान्याचा पुरवठा झाला, तरी तो मर्यादित स्वरूपात असतो किंवा काही वेळा घराबाहेर जाणे अशक्य होऊन बसते. त्यामुळे अन्नधान्य साठवावे लागते. धान्ये, कडधान्ये, तेल, तूप, मसाले यांचा साठा करावा. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली धान्ये रासायनिक फवारणी करून पिकवलेल्या धान्यांच्या तुलनेत जास्त दिवस टिकतात.
‘अकोला, महाराष्ट्र येथील ज्येष्ठ आयुर्वेद तज्ञ वैद्य अरुणराठी यांनी अन्नधान्याची साठवणूक करण्याची पुढील पद्धत सांगितली आहे. एप्रिल-मे या मासांमध्ये धान्याची खरेदी शक्यतो शेतकर्याकडून थेट करावी आणि ते कडक उन्हात शक्य तितके खडखडीत वाळवावे. ज्यात धान्य साठवून ठेवायचे असेल, ते डबे, पिंप किंवा ड्रम स्वच्छ धुऊन कडक उन्हात ठेवावेत. उन्हात ठेवणे शक्य नसेल, तर थोडे उष्ण (गरम) करावेत. त्यांतील पाणी पूर्णपणे निघून गेले पाहिजे. डब्यांऐवजी पिशव्या किंवा गोण्या वापरायच्या असतील, तर त्या शक्यतो नवीन असाव्यात. नवीन न मिळाल्यास त्या स्वच्छ धुऊन उन्हात वाळवून त्यांतील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून गेल्याची निश्चिती करावी.
धूपन कसे करावे ?
१. गोवर्या, कडूनिंबाची पाने, मोहरी, सैंधव मीठ, हळद आणि विशेषतः सुकी (तांबडी) मिरची एकत्र करून कापराच्या वडीच्या साहाय्याने जाळून धूर करावा. त्यावर धान्य साठवण्याचे भांडे उपडे धरावे आणि भांड्यामध्ये धूर भरू द्यावा.
२. भांड्यात धूर भरल्यावर भांड्याचे झाकण लावून १५ ते २० मिनिटे बंद करून ठेवावे. या प्रक्रियेला ‘धूपन’ असे म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या अन्नधान्य साठवणुकीसाठी धूपन पुष्कळ महत्त्वाचे आहे. धूपन क्रियेमध्ये वापरल्या जाणार्या पदार्थांमुळे, विशेषतः तांबड्या मिरचीमुळे धान्याला कीड लागत नाही.
३. ज्यांना शक्य आहे, त्यांनी धूपनासाठीच्या वरील पदार्थांमध्ये थोडा गंधक, राळ, लोहबान (एक प्रकारचा धूप) आणि वेखंड यांचाही वापर केल्यास धूपन जास्त परिणामकारक होते. हे पदार्थ आयुर्वेदीय औषधे बनवण्यासाठीचे सामान मिळते, त्या दुकानात मिळतात.
धान्याला कीड लागू नये, यासाठी करण्याचे काही अन्य उपाय
जे धान्य धुवून घेऊ शकतो, त्याला बोरीक पावडर लावून ठेवावी. १० किलोला १० ग्रॅम ‘बोरिक पावडर’ पुरते. धान्य कागदावर पसरून थोडी थोडी ‘बोरिक पावडर’ धान्यावर घालून धान्य हाताने वर-खाली करावे, जेणेकरून ‘पावडर’ सर्व धान्याला लागेल.
विशेषतः डाळींना, तसेच मूग, हरभरे इत्यादी द्विदल धान्यांना राख लावली जाते. साधारणपणे १० किलो धान्यासाठी एक ते दीड किलो कोरडी राख वापरावी. डब्यात धान्य भरतांना आरंभी राखेचा एक थर करून त्यावर धान्याचा एक थर आणि पुन्हा राखेचा एक थर असे आलटून पालटून करावे. सर्वांत शेवटी राखेचा एकेक थर करावा. ज्वारी, बाजरी आणि गहू यांना एरंडेल तेल लावावे. साधारण २० किलो धान्याला अर्धी वाटी (७५ मि.ली.) एरंडेल तेल चोळून लावावे.
धान्यात कीड न होण्यासाठी अन्य उपायांसह धूपन करणे !
१. डब्याच्या आकारापेक्षा धान्य अल्प असेल, तर ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून डब्यात ठेवावे. डब्यात किंवा पिशवीत धान्य पुढीलप्रमाणे भरावे.
अ. कडूनिंबाची पाने कडक उन्हात वाळवून त्यांतील पाण्याचा अंश निघून गेल्याची निश्चिती करावी. पाने करपू देऊ नयेत. कडूनिंबाची पाने मिळाली नाहीत, तर याचप्रमाणे निर्गुंडीच्या झाडाची पाने वापरावीत.
आ. डब्यात किंवा पिशवीत धान्य भरतांना कडूनिंबाची वाळलेली काही पाने तळाशी ठेवून त्यावर कागद किंवा स्वच्छ धुऊन वाळवलेले सुती कापड पसरावे. त्यानंतर डब्यात धान्य भरावे.
इ. धान्य भरतांना एका किलोला ४-५ या प्रमाणात मध्ये मध्ये उन्हात खडखडीत वाळवलेले बिब्बे घालावेत. बिब्बे न मिळाल्यास आयुर्वेदीय ‘भीमसेनी’ कापराच्या वड्या वेगवेगळ्या कागदांत गुंडाळून एक किलो धान्यासाठी एक वडी याप्रमाणे धान्यात मध्ये मध्ये ठेवाव्यात.
ई. धान्य भरून झाल्यावर त्यावर पुन्हा एक कागद किंवा सुती कापड पसरून त्यावर पुन्हा कडूनिंबाच्या वाळलेल्या पानांचा एक थर रचावा.
उ. डब्याच्या झाकणाला आतील बाजूने ‘सेलोटेप’च्या साहाय्याने एक कापराची वडी चिकटवावी. पिशवीत कापराची वडी ठेवायची असल्यास ती कागदामध्ये गुंडाळून सर्वांत वर ठेवावी आणि पिशवीचे तोंड घट्ट बांधावे.
२. डब्यात हवा जाऊ नये, यासाठी डब्याचे झाकण घट्ट लावावे. झाकण घट्ट लागण्यासाठी आवश्यकतेनुसार कागद किंवा प्लास्टिक पिशवी यांचे आच्छादन (पॅकिंग) घालावे.
३. धान्य भरलेले डबे किंवा पिशव्या योग्य ठिकाणी ठेवावे.
४. धान्य साठवण्याची खोली पावसाळ्यात ओल न येणारी (कोरडी) असावी. धान्य साठवून ठेवण्यापूर्वी खोली स्वच्छ झाडून पुसून घ्यावी. या खोलीमध्ये वर सांगितल्याप्रमाणे ‘धूपन’ करावे आणि १५ ते २० मिनिटे खोली बंद ठेवावी. या खोलीची नियमित स्वच्छता करावी आणि आठवड्यातून एकदा धूपन करावे.
५. धान्याचे डबे भूमीवर न ठेवता मांडणी किंवा पाट यांवर ठेवावेत. मांडणी भिंतीला टेकवून न ठेवता थोडे अंतर राखून ठेवल्यास स्वच्छता करणे सोपे जाते. धान्य साठवणुकीच्या ठिकाणी उंदीर किंवा घुशी येऊ नयेत, यासाठी खोलीची दारे, तसेच भिंती यांत फटी राहू देऊ नयेत.
६. शक्य असल्यास धान्य साठवण्याच्या ठिकाणची हवा बाहेर काढून टाकण्याची (‘एक्झॉस्ट’ची) व्यवस्था करावी.
७. मासातून (महिन्यातून) एकदा साठवणुकीतील धान्याची पडताळणी (तपासणी) करावी.
८. धान्याला ओले हात लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
९. दिवाळीनंतर पाऊस जातो आणि ऊन पडू लागते. त्या वेळी धान्याला पुन्हा ऊन दाखवून पूर्वीप्रमाणे धूपन करून भरून ठेवावे.योग्य ती काळजी घेऊन धान्य भरल्यास धान्याला सहसा कीड लागत नाही; परंतु हवेमध्ये आर्द्रता जास्त असलेल्या समुद्रापासून जवळ असलेल्या प्रदेशांत सांगितल्याप्रमाणे ‘धूपन’ करणे अत्यावश्यक आहे .वर दिलेली धान्य साठवण्याची पद्धत सर्वच पदार्थांसाठी, उदा. सर्व प्रकारची धान्ये, कडधान्ये, मसाल्याचे पदार्थ, गूळ, साखर इत्यादींसाठी वापरता येते.
– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.