देशातील ४२ सहस्र शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची, तर १५ सहस्र शाळांमध्ये शौचालयांची सोय नाही ! – केंद सरकारची माहिती

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही अशी स्थिती असणे हे आतापर्यंतच्या  शासनकर्त्यांना लज्जास्पद ! सरकारने अशी माहिती देण्यासह ही स्थिती सुधारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी भारतियांची अपेक्षा आहे !

रमेश पोखरियाल

नवी देहली –  देशातील ४२ सहस्रांपेक्षा अधिक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तर १५ सहस्रांपेक्षा अधिक शाळांमध्ये शौचालये नाहीत, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. एकात्मिक जिल्हा माहिती प्रणाली शिक्षणाच्या आकडेवारीच्या आधारे त्यांनी ही माहिती दिली. पाणी आणि शौचालये यांच्या अनुपलब्धतेमध्ये आसाम अग्रेसर असल्याची माहिती या आकडेवारीमध्ये देण्यात आली आहे. येथे ८ सहस्र ५२२ शाळांमध्ये पिण्याचे पाणी नाही, तर १३ सहस्र ५०३ शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालये नाहीत. (आसाममध्ये गेली ५ वर्षे भाजपचे सरकार असतांना अशी स्थिती असणे अपेक्षित नाही ! – संपादक)

पोखरियाल म्हणाले की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सरकारी शाळांसह सर्व शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि सर्व मुलांसाठी सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचना वारंवार दिल्या आहेत. सर्व शाळांमध्ये सुरक्षित आणि पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

(केवळ सूचना देऊन उपयोग नाही, तर त्यांना कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून त्या दूर करण्याचाही प्रयत्न सरकारने केला पाहिजे ! – संपादक)