महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा भोंगळ कारभार !
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न कसे काय दिले जातात ? यावर कुणाचा अंकुश नाही का ? अशा चुकांमुळे वाया जाणारा वेळ आणि विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप कसा भरून निघणार ?
पुणे – दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पूर्वसिद्धतेसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (‘एस्.सी.ई.आर्.टी.’ने)े विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच सिद्ध केले आहेत. हे प्रश्नसंच परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले; मात्र राज्य सरकारने कमी केलेल्या २५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचाही या संचात समावेश असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालक संभ्रमात पडले आहेत.
परीक्षेची सिद्धता करतांना विद्यार्थ्यांना ताण येऊ नये म्हणून राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच सिद्ध करण्याचे दायित्व परिषदेला दिले होते; पण यातील प्रश्न संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असल्याने परीक्षेसाठी नेमका अभ्यास कसा करायचा ? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. ‘न्यून केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असलेले प्रश्न या संचातून लवकरच वगळण्यात येतील’, असे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले.