गोवा राज्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत ‘ऑनलाईन’ नामजप सोहळ्यांमध्ये ‘ॐ नम: शिवाय ।’चा गजर
सोलापूर, १६ मार्च (वार्ता.) – हिंदु धर्मामध्ये महाशिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शिवाचे चैतन्य सर्वांना अनुभवता यावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा राज्यासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात ‘ऑनलाईन’ पद्धतीने नामजप सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. आपापल्या घरातूनच या सोहळ्यांत सहभागी झालेल्या जिज्ञासूंनी या सोहळ्यामध्ये ‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप भावपूर्णरित्या केला. त्यानंतर भगवान शिवाची मानसपूजा आणि आरती करण्यात आली.
सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ठिकठिकाणची शिव मंदिरे बंद ठेवण्यात आली होती; मात्र ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्यात आलेल्या नामजप सोहळ्यांमध्ये भगवान शिवाची मानसपूजा केल्याने प्रत्यक्ष मंदिरात जाऊन शिवाचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण झाली’, असे सहभागी झालेल्या अनेक जिज्ञासूंनी या वेळी सांगितले. घरबसल्या या नामजप सोहळ्यात सहभागी होता आल्याने जिज्ञासूंनी कृतज्ञता व्यक्त केली, तर अनेक जिज्ञासूंनी ‘असे उपक्रम सातत्याने घ्यावेत’, अशी मागणीही केली.
५ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी घेतला नामजप सोहळ्यांचा लाभ !
या नामजप सोहळ्यांचे आयोजन गोवा राज्यामध्ये ५३ ठिकाणी, पुणे जिल्ह्यात ३५ ठिकाणी, सातारा जिल्ह्यात ६२ ठिकाणी, सांगली जिल्ह्यात ४३ ठिकाणी, सोलापूर जिल्ह्यात १४२ ठिकाणी, तर कोल्हापूर जिल्ह्यात १०९ ठिकाणी करण्यात आले होते. या नामजप सोहळ्यांचा ५ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. विशेष म्हणजे या सत्संगात जिज्ञासूंसमवेत त्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.
क्षणचित्रे
१. पुणे येथे एके ठिकाणी नामजप सोहळ्याला अनेक वाचक आणि हितचिंतक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
२. म्हापसा (गोवा) येथील महिला मंडळ बचतगटामध्ये ३ ठिकाणी नामसत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये मंडळातील सहभागी महिलांनी ‘नामजप केल्याने पुष्कळ प्रसन्न वाटले’, असे सांगितले, तर अशा प्रकारच्या नामसत्संगामध्ये नियमितपणे सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.
३. गोवा येथे एके ठिकाणी झालेल्या नामजप सोहळ्यात एक ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली आहे.
नामजप सोहळ्यांच्या उपक्रमात धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !
१. पुणे येथील धर्मप्रेमी सौ. वनिता साळुंखे आणि सौ. वैशाली काकडे यांनी २ ठिकाणी सामूहिक नामजप सोहळ्याचे आयोजन पुढाकार घेऊन केले.
२. सोलापूर येथील धर्मप्रेमी आणि साधना सत्संगात सहभागी होणारे जिज्ञासू यांच्यासाठी घेण्यात आलेल्या एका नामजप सोहळ्यात ४०० हून अधिक जिज्ञासू सहभागी झाले होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सोलापूर येथील ‘ऑनलाईन’ साधना सत्संगातील जिज्ञासू श्री. विक्रम लोंढे यांनी केले, तर लातूर येथील धर्मप्रेमी सौ. वैशाली बरूरे यांनी भगवान शिवाची मानसपूजा सांगितली.
३. कोथरूड (पुणे) येथील ‘सनातन प्रभात’चे वाचक सौ. रेश्मा कुंभार, हडपसर (पुणे) येथील धर्मप्रेमी कु. मानसी दहिवडकर आणि सौ. प्रमिला राठी यांनी या सोहळ्यामध्ये पुढाकार घेऊन सेवा केली.
४. या सोहळ्यामध्ये कोथरूड (पुणे) येथील ऑनलाईन स्वरक्षण प्रशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
५. सांगली जिल्ह्यातील साधना सत्संगातील जिज्ञासू श्री. बिराजदार यांनी महाशिवरात्रीनिमित्त त्यांच्या गावात ‘ऑनलाईन’ पद्धतीने २ प्रवचनांचे आयोजन केले. प्रवचन चालू झाल्यानंतर त्यांनी प्रत्येकाच्या घरी त्या जिज्ञासूंना आवाज व्यवस्थित येत आहे ना, याची निश्चिती केली. प्रत्येकाला प्रवचनाचा लाभ घेता यावा, अशी त्यांची तळमळ होती.
नामजप सोहळ्याच्या वेळी जिज्ञासू आणि वाचक यांना आलेल्या अनुभूती
१. हडपसर (पुणे) येथे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक नामजप सोहळ्यात सहभागी जिज्ञासूंनी ‘प्रत्यक्ष मंदिरात बसून शिवाला बेल वहात आहोत’, असे जाणवले, तर एका जिज्ञासूंनी ‘मला प्रत्यक्ष भगवान शिवाचे दर्शन होऊन पुष्कळ शांत वाटले’, असे सांगितले. एका जिज्ञासूंनी ‘नामजप करतांना भगवान शिवाची मूर्ती डोळ्यांसमोर येऊन त्यातून चैतन्याचे कण प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले’, असे सांगितले.
२. सौ. साधना निगडेकर (सातारा) – मी ५ दिवस नामजप केल्यामुळे घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न झाले होते. यापूर्वी पुष्कळ चिडचिड होत होती, आता मनाची स्थिरता वाढली आहे. माझ्या मनाच्या स्थितीत एवढा पालट झाला की, यजमानांनी विचारले, ‘तू काय केलेस ? ज्यामुळे घरात चांगले वाटत आहे.’
३. सातारा येथील एका जिज्ञासूने सांगितले की, सलग ३ दिवस नामजप केल्यामुळे माझ्या डोळ्यांचे शस्त्रकर्म चांगले होऊन स्वच्छ दिसायला लागले.
४. श्री. बळवंत कुलकर्णी (मंगळवेढा, जिल्हा सोलापूर) – नामजप भावपूर्ण झाला. भावजागृती झाली, नामजप संपूच नये, असे वाटत होते. घरातील वातावरण शिवमय झाल्याचे अनुभवले.
५. सोलापूर येथील ‘सनातन प्रभात’चे वाचक सौ. गीता गुळमिरे यांनी सांगितले की, महाशिवरात्रीच्या दिवशी ‘परात्पर गुरु (डॉ.) आठवले घरी आले असून ते भस्माचे महत्त्व सांगत होते’, असे जाणवले.
६. कोल्हापूर जिल्ह्यातील कु. अरुणा कुरणे यांनी सांगितले की, ७ दिवस प्रतिदिन नामजप केल्यावर मनाची मरगळ दूर होऊन एकप्रकारचा उत्साह जाणवतो, तसेच माझ्या मनातील अनावश्यक विचार दूर होण्यास साहाय्य झाले.
७. कोल्हापूर जिल्ह्यातील सौ. सुगंधा गायकवाड या न चुकता ७ दिवस ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपामध्ये सहभागी होत होत्या. त्यांच्यासमवेत त्यांचे यजमानही नामजपाला बसत होते. ‘नामजप केल्याने मनाची शांतता वाढली आहे’, असे त्यांनी सांगितले.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |