आय्.पी.एल्.च्या बेटींगवाल्यांकडून मिळणार्या हप्त्याचा संबंध
मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – वर्ष २०२० मध्ये झालेल्या आय्.पी.एल्.च्या सामन्यांच्या बेटिंगची सर्व ठिकाणे सचिन वाझे यांना ठाऊक होती. त्यांच्यावर धाड टाकू नये, यासाठी सचिन वाझे यांनी प्रत्येक बेटिंगवाल्याकडे १०० ते १५० कोटी रुपयांचे हप्ते मागितले होते. त्यामध्ये वाटा मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक वरुण सरदेसाई हे सचिन वाझे यांच्या संपर्कात होते, असा गंभीर आरोप भाजप आमदार नीतेश राणे यांनी १५ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत केला. ‘हे मी माहितीच्या आधारे सांगत असून याविषयी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने चौकशी करावी’, अशी मागणी त्यांनी केली.
या वेळी नीतेश राणे म्हणाले, ‘‘एक साधा साहाय्यक पोलीस निरीक्षक एवढे मोठे पाऊल उचलतो आणि त्याची वकिली करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सामनाचे सहसंपादक पुढे का येत आहेत ? याची चौकशी व्हायला हवी. वरुण देसाई आणि सचिन वाझे यांच्यात झालेले दूरभाषवरील संभाषण पडताळण्यात यावे. सरदेसाई यांना कुणाचा पाठिंबा आहे ? कुणाच्या सांगण्यावरून ते सचिन वाझे यांना संपर्क करत होते ? याची चौकशी करायला हवी. सचिन वाझे यांनी नियुक्ती घेतलेली असतांना कोरोनाच्या नावाखाली केवळ ४ अधिकार्यांना पोलीसदलात का घेण्यात आले ? सचिन वाझे यांना अटक होण्यापूर्वी ते शिवसेनेच्या एका उपनेत्याला भेटले. त्यांच्याशी ‘टेलिग्राम’वर झालेले संभाषण या सर्वांची चौकशी करण्यात यावी.’’