आमदार विनायक मेटे यांचा गंभीर आरोप
राज्यात उघडपणे होत असलेली वाळू तस्करी शासन आणि प्रशासन यांना दिसत नाही का ? वाळू तस्करीचे सूत्र सातत्याने विधीमंडळात उपस्थित होऊनही, ती रोखता न येणे, ही प्रशासकीय यंत्रणा भ्रष्ट असल्याचे द्योतक आहे. हा तळागाळात पोचलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे राज्यकर्ते असलेले राष्ट्रच आवश्यक आहे !
मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – नगर ते नांदेड जिल्ह्याच्या दरम्यान जेवढे तालुके आहेत, त्यांमध्ये अवैध वाळू उपसा होत आहे. वाळूच्या निविदा काढल्या जात नसतांना वाळूच्या सहस्रावधी गाड्या कशा काय चालू आहेत. यामध्ये महसूल विभागाच्या अधिकार्यांचा सहभाग आहे, असा गंभीर आरोप शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी विधान परिषदेत केला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था यांवरील चर्चेच्या वेळी आमदार मेटे यांनी वरील विषय मांडला. या वेळी विनायक मेटे म्हणाले, ‘‘राज्यात वाळू तस्करांचे मोठे रॅकेट आहे. यामुळे भ्रष्टाचाराचे कुरण निर्माण झाले आहे. १० सहस्र रुपयांची वाळू ५० सहस्र रुपयांना विकली जात आहे. यामुळे घराच्या किमती वाढल्या आहेत. वाळू माफियांना पायबंद घालणे आवश्यक आहे.’’