गोव्यातील अमली पदार्थ पुरवठ्याची साखळी मोडून काढू ! – समीर वानखेडे, विभागीय संचालक, ‘एन्.सी.बी.’

पणजी – गोव्यातील अमली पदार्थ पुरवठ्याची साखळी मोडून काढण्यात येणार आहे. गोव्यात अमली पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणावर होत असते. अमली पदार्थांचे उत्पादन होणारी ठिकाणे शोधून काढून ती उद्ध्वस्त करणे, तसेच गोव्यातील देशी आणि विदेशी अमली पदार्थ व्यावसायिक यांची सूची सिद्ध करणे, अमली पदार्थांचा पुरवठा करणे, याचा ‘डाटा’ सिद्ध करणे आणि ‘एन्.डी.पी.एस्.’ कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करणे, यासाठी अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एन्.सी.बी.) कृतीशील असेल, अशी माहिती ‘एन्.सी.बी.’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलतांना दिली. ‘एन्.सी.बी.’ने गेल्या काही दिवसांत गोव्यात ठिकठिकाणी अमली पदार्थाच्या विरोधात छापासत्र आरंभून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ कह्यात घेतले होते आणि अमली पदार्थ व्यावसायिकांनाही कह्यात घेतले होते.

विभागीय संचालक समीर वानखेडे पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात अमली पदार्थ घेऊन येणार्‍या आणि येथून परत जाणार्‍या माध्यमांवर लक्ष ठेवले जाणार आहे. अमली पदार्थ व्यावसायिकांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी गोव्यातील अशासकीय संस्थां (एन्.जी.ओ.)चे साहाय्य घेण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवक यांना अमली पदार्थाच्या दुष्परिणामांविषयी माहिती देण्यासाठी अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था आदींचे साहाय्य घेतले जाणार आहे.’’