चीनचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्याविना तणाव असलेल्या ठिकाणांपासून भारतीय सैन्य माघारी फिरणार नाही ! – भारताने चीनला सुनावले

चीनवर कधीही विश्‍वास ठेवता येणार नाही, हेच यातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. भारताने अशीच सतर्कता बागळली, तरच चीनला जशास तसे उत्तर देता येईल !

नवी देहली – जोपर्यंत तणाव असलेल्या ठिकाणांवरून चीनचे सैन्य माघारी जात नाही, तोपर्यंत पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळील भारतीय सैन्य माघारी फिरणार नाही, असे भारतीय सैन्याने चीनला सुनावले असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. पँगाँग तलावाजवळील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून दोन्ही देशांचे सैन्य माघारी जाण्याचा निर्णय घेतल्यावर पहिल्या टप्पा पूर्ण झाला असला, तरी आता ही प्रक्रिया धीम्या गतीने चालू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अन्य तणावाच्या ठिकाणांविषयी दोन्ही देशांच्या सैन्यात चर्चा होणार होती; मात्र ती थांबवण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्ताव यांनी म्हटले की, दोन्ही देशांतील संबंध तेव्हाच पुढे जातील जेव्हा सीमेवर शांती राहील. यासाठी पूर्व लडाखमधून दोन्ही देशांचे सैन्य मागे गेले की, शांतता निर्माण होईल. त्यासाठी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे.