कायद्याचे भय नसल्याचे उदाहरण !
नगर, ५ मार्च – शिर्डी संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात ११ फेब्रुवारी या दिवशी शिवाजी राजगुरु यांची फसवणूक करणारा आरोपी सतीश दगडू पाटील याला शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे. शासनाचा माणूस आहे, असे सांगून तो रुग्णांची फसवणूक करत आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने शिर्डीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून काही रुग्णालयांचे कागदपत्र असलेली धारिका, त्यामध्ये रुग्णांच्या उपचाराचे कागदपत्र आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसंबंधीचे छापील अर्ज आढळून आले.
राजगुरु यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून आरोपीने अहवालासह कागदपत्रे, तसेच १ सहस्र ५०० रुपये घेतले. बराच वेळाने राजगुरु यांनी रुग्णालय प्रशासनाकडे चौकशी केली. तेव्हा असा कोणताही माणूस तेथे नियुक्त नसल्याचे किंवा त्यांच्याकडे पैसे घेऊन आला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. अशाच पद्धतीने संभाजीनगर घाटी रुग्णालयात आणि धुळे येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातही रुग्णांची फसवणूक केली असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे.