कर्नाळा बँकेतील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी कारवाई करा ! – आमदार प्रशांत ठाकूर

आमदार प्रशांत ठाकूर

मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – कर्नाळा बँकेतील आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यावर कारवाई करावी, यासाठी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ४ मार्च या दिवशी विधीमंडळाच्या इमारतीच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. १७ फेब्रुवारी २०२० या दिवशी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येऊनही कारवाई झाली नसल्यामुळे हातात फलक धरून आमदार ठाकूर यांनी शासनाचा निषेध केला.

या प्रकरणी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की,

१. ३१ मार्च २०१९ या दिवशी रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवून कर्नाळा बँकेच्या संपूर्ण कर्जव्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण करण्याची सूचना करण्यात आली होती.

२. रिझर्व्ह बँकेच्या पत्रानुसार, सहकार आयुक्त आणि निबंधक यांनी रायगड सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखापरीक्षकांद्वारे कर्नाळा बँकेच्या ६३ कर्ज खात्यांचे अन्वेषण करण्यात आले आहे.

३. या अन्वेषणानंतर सहकार आयुक्त आणि निबंधक यांना अहवाल सादर करण्यात आला आहे. अहवालानुसार बँकेच्या कर्ज खात्यांतून ५१२ लाख ५५ सहस्र रुपये इतकी रक्कम कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली आहे.

४. शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेकानंद पाटील या संस्थांचे अध्यक्ष आहेत. बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे पैसे अद्याप देण्यात आलेले नाहीत. याविषयी मी स्वत: आणि कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती यांनी विविध शासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार केला आहे. याविरोधात १६ मार्च २०२० या दिवशी अंमलबजावणी संचालनालय, तसेच अपर पोलीस महासंचालक यांसह अन्य अन्वेषण यंत्रणांकडे तक्रार करण्यात आली असून या प्रकरणी कारवाई करण्यात यावी.

प्रत्येक ठेवीदाराचे पैसे परत करण्याचे माझे नैतिक दायित्व ! – विवेक पाटील, माजी आमदार, शेकाप

मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – कर्नाळा बँकेत ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीतील एकही पैसा मी किंवा माझे नातेवाईक यांनी वापरलेला नाही. ठेवीदारांचा एकही पैसा माझ्या नावावर करण्यात आलेला नाही. या प्रकरणी न्यायालयात मी रिट याचिका प्रविष्ट केली आहे. माझी ५८४ कोटी रुपयांची मालमत्ता मी न्यायालयात दाखवली आहे. ही मालमत्ता विकून मी ठेवीदारांचे पैसे परत करीन. प्रत्येक ठेवीदाराचे पैसे परत करण्याचे माझे नैतिक दायित्व आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांनी व्यक्त केली.