इस्रोकडून १९ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण !

१९ मध्ये १३ उपग्रह अमेरिकेचे, तर १ ब्राझिलचा !

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘पी.एस्.एल्.व्ही.’ रॉकेटच्या माध्यमातून सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी इस्रोने यशस्वीरित्या १९ उपग्रह अंतराळात पाठवले. यामध्ये ब्राझिलच्या ‘अमेझोनिया-१’ या उपग्रहासमवेत अमेरिकेचे १३ उपग्रह होते. तसेच याव्यतिरिक्त १८ नॅनो उपग्रहही प्रक्षेपित करण्यात आले. यामध्ये चेन्नईचा ‘स्पेसकिड्स इंडिया’चा ‘सतीश धवन’ उपग्रहाचासुद्धा यात समावेश आहे. या अंतराळ यानाच्या टॉप पॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहे.

हा त्यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमासाठी आणि अवकाश खासगीकरणासाठीच्या योजनेविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा प्रयत्न आहे. तसेच एक एस्.डी. कार्डमध्ये सेव्ह करत श्रीमद्भगवद्गीताही अंतराळात पाठवण्यात आली आहे. मुख्य उपग्रह भारतीय नसलेले हे पहिलेच प्रक्षेपण आहे. ‘पी.एस्.एल्.व्ही.’ रॉकेटचे हे ५३ वे उड्डाण आहे. भारताने आतापर्यंत ३४ देशांचे ३४२ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. इस्रो तमिळनाडूतील थुथुकुडी जिल्ह्यातील कुलाशेकरट्टीनम्मध्ये प्रक्षेपण केंद्र सिद्ध करणार आहे.