बलात्कार्‍याला हाकलून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा ! – चित्रा वाघ यांचा घणाघात

पूजा चव्हाण आत्महत्येचे प्रकरण

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते, तर संजय राठोड यांना फाडून काढले असते !

डावीकडून चित्रा वाघ,  संजय राठोड

नाशिक – आम्ही विरोधी पक्षात असलो, तरी आम्हाला तुमच्याविषयी आदर आहे. २१ दिवस झाले, तरी पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणात गुन्हाही नोंदवण्यात आलेला नाही. मुख्यमंत्रीसाहेब, खरंच खुर्ची एवढी वाईट आहे का ? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते, तर राठोड यांना फाडून काढले असते. बलात्कार्‍याला हाकलून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी २७ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केली.

या वेळी सौ. चित्रा वाघ म्हणाल्या की,

१. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दबाव स्वीकारणारे नाहीत. सत्तेसाठी झुकणारे नाहीत, असा विश्‍वास आहे.

२. जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे काम चालू आहे. एका बलात्कार्‍याला वाचवण्यासाठी तिन्ही पक्षांचे सरकार एकत्र आले आहे. चुकीचा पायंडा महाराष्ट्रात पडत आहे. एवढे सारे पुरावे असतांनाही कारवाई होत नाही, हे तर नामर्द सरकार आहे.

३. साधी तक्रारही प्रविष्ट केली जात नाही. संजय राठोड यांच्याविरुद्ध पुरावे असतांनाही त्यांच्यावर कारवाई होत नाही. सरकार, पोलीस आणि प्रशासन हे सर्व जण मिळून बलात्कार्‍याला वाचवत आहेत. यात त्यांची एकी दिसून येते.

४. पूजा चव्हाण हिच्या भ्रमणभाषवर संजय राठोड नावाच्या व्यक्तीचे ४५ ‘मिस्ड कॉल’ होते. हा संजय राठोड कोण आहे ? याचे उत्तर द्यावे. त्याविषयी अद्यापही काही स्पष्टता नाही. पुण्याच्या आयुक्तांकडे एकाही प्रश्‍नाचे उत्तर नाही.