महिलेवर दुष्कर्म करणार्‍या पोलिसासह दोघांवर गुन्हा नोंद

पत्नीला चारित्र्याची परीक्षा देण्यासाठी उकळत्या तेलातून नाणे काढण्यास भाग पाडणार्‍या पतीविरोधातही गुन्हा नोंद

सोलापूर – धाराशिव जिल्ह्यातील पीडित महिला माहेरी जात असतांना दोन जणांनी तिला दुचाकीवरून उसाच्या शेतामध्ये उतरवून ४-५ दिवस हात-पाय बांधून ठेवले, तसेच तिच्यावर दुष्कर्म केले. या घटनेत एका पोलिसाचाही समावेश असल्याचे पीडित महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. (वासनांध पोलीस ! पीडितेला साहाय्य न करता तिच्यावर अत्याचार करणारे पोलीस महिलांचे शीलरक्षण कसे करू शकतील ? अशांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित ! – संपादक)

दुष्कर्म केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तर या प्रसंगानंतर पीडित महिलेला तिच्या पतीने चारित्र्याची परीक्षा देण्यासाठी उकळत्या तेलातून नाणे काढण्यास भाग पाडले. या प्रकरणी पतीच्या विरोधातही गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. महिलेची ही तक्रार धाराशिव पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.