(म्हणे) ‘पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना चर्चेसाठी पाठवलेला प्रस्ताव अयशस्वी ठरला !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

  • भारतात जिहादी आतंकवादी कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांची निर्मिती करणार्‍या, भारताचा अविभाज्य भाग असणार्‍या काश्मीरच्या मोठ्या भूभागाला कह्यात घेणार्‍या पाकशी भारताने का म्हणून चर्चा करावी ?, हे इम्रान खान यांनी प्रथम स्पष्ट केले पाहिजे !
  • स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि भारताच्या पंतप्रधानांची प्रतिमा मलीन करण्यासाठी इम्रान कशा प्रकारे प्रयत्न करत आहेत, हेच यातून दिसून येते !
पंतप्रधान नरेंद्र मोदी व इम्रान खान

कोलंबो (श्रीलंका) – मी सत्तेत आल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संपर्क केला होता. मी मोदी यांना म्हणालो होतो, ‘आपल्या देशांच्या अंतर्गत जी सूत्रे आहेत, ती चर्चेद्वारे सोडवता येतील; मात्र यात यश आले नाही’, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी येथे केले. ते २ दिवसांच्या श्रीलंका दौर्‍यावर आहेत. खान यांनी आशा व्यक्त केली, ‘येणार्‍या काळात ही सूत्रे सोडवली जातील.’ ते एका कार्यक्रमात बोलत होते.

इम्रान खान पुढे म्हणाले की, जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामध्ये अनेकदा वाद झाले. आज तुम्ही तेव्हाच्या परिस्थितीचा विचारदेखील करू शकत नाही; पण ते व्यापारामुळे परत एकत्र आले. अशाच प्रकारचे माझे स्वप्न आहे की, उपमहाद्वीपमधील मतभेद आणि वाद संपुष्टात यावेत.

काश्मीर वाद आम्हाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाच्या पद्धतीने सोडवावा लागेल. यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे चर्चा.